ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

| Updated on: Nov 13, 2020 | 1:31 PM

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. (kirit somaiya allegations cm uddhav thackeray over bought property)

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरिट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. (kirit somaiya allegations cm uddhav thackeray over bought property)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर आरोपांचा धडाका लावला. ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले. ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असा सवाल सोमय्या यांनी केला. मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असंही ते म्हणाले.

अजून 9 सातबारा उतारे देणार

ठाकरे कुटुंबाच्या जमीन व्यवहाराचं एक प्रकरण बाहरे काढल्यानंतर मला राज्यभरातील लोकांचे फोन येत आहेत. लोक मला भेटून अजून नवनवीन माहिती देत आहे. येत्या काही दिवसात ठाकरे कुटुंबांच्या आणखी नऊ जमीन व्यवहारांची माहिती देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. मी कोणताही आरोप पुराव्याशिवाय करत नाही. त्यामुळे मला शिव्या देऊन काहीच होणार नाही. ठाकरे सरकारच्या प्रवक्त्यांनी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी हिंमत असेल तर या जमिनीच्या व्यवहारावर बोलावं, विनाकारण विषय डायव्हर्ट करू नये, असं आव्हानही त्यांनी राऊत यांना दिलं. (kirit somaiya allegations cm uddhav thackeray over bought property)

मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागितली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेकडून किरीट सोमय्यांच्या या आरोपावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार, हे पाहावे लागेल.

 

संबंधित बातम्या:

LIVE | मी पुराव्याशिवाय बोलत नाही, सोमय्यांचं राऊतांना उत्तर

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

(kirit somaiya allegations cm uddhav thackeray over bought property)