चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टरकडून वकील पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टरकडून वकील पत्नीची हत्या

जळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन डॉक्टर पतीने वकील पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे.

विद्या राजपूत ऊर्फ राखी पाटील (वय 37) या जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील या पदावर कार्यरत होत्या. भुसावळ तालुक्यातील बोहर्डे येथे त्यांचे माहेर आहे. 15 वर्षांपूर्वी विद्या यांचा जळगावच्या डॉ. भरत पाटील याच्याशी विवाह झाला. डॉ. भरत याचं जामनेर येथे क्लिनीक आहे.

लग्नानंतर सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं, मात्र लग्नाच्या काही वर्षांनी या दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यांच्यात नेहमीच भांडणं व्हायची. त्यात डॉ. भरत विद्या यांना मारहाणही करायचा. 13 जानेवारीला यांच्यात असाच एक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, डॉ. भरतने विद्या यांना जबर मारहाण करुन त्यांचा गळा आवळला. यात विद्या यांचा मृत्यू झाला.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव पतीने रचला. डॉ. भरत याने विद्याच्या माहेरच्यांना तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली. यानंतर विद्याच्या घरच्यांनी तिच्या राहत्या घरी जामनेर येथे धाव घेतली. मात्र, घरी कोणीच सापडले नाही. त्यानंतर त्यांनी भुसावळ रुग्णालयातही शोधा-शोध केली. तिथेही त्यांना विद्या किंवा डॉ. भरत आढळले नाही.त्यामुळे विद्याच्या घरच्यांनी डॉ. भरतचं मुळगाव असलेल्या भुसावळमधील बेलखेड गाठले. तेथे त्यांना विद्याचा मृत्यू झाल्याचे कळाले.

डॉ. भरतने विद्याच्या अंतिमसंस्काराची पूर्ण तयारी केली होती. हे सर्व बघून विद्याच्या घरच्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पती भरत यानेच विषारी इंजेक्शन देऊन विद्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे शवविच्छेदन झाल्या शिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

यानंतर विद्याचा मृतदेह जळगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पती डॉ. भरत पाटीलने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, चौकशीअंती चारित्र्याच्या संशयावरून आपणच पत्नी विद्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI