गांधीजींचा चष्मा चोरी प्रकरण, आठ वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

वर्धा : सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमधून महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरीच्या घटनेला आता आठ वर्षे होत आली आहेत. या घटनेत सीआयडी चौकशी होऊन एकाला अटकही करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. आता न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोषमुक्त केलं आहे. 13 जून 2011 रोजी सेवाग्राम आश्रमाच्या वतीने चष्मा चोरीला गेल्याची […]

गांधीजींचा चष्मा चोरी प्रकरण, आठ वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता
Follow us on

वर्धा : सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमधून महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरीच्या घटनेला आता आठ वर्षे होत आली आहेत. या घटनेत सीआयडी चौकशी होऊन एकाला अटकही करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. आता न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोषमुक्त केलं आहे.

13 जून 2011 रोजी सेवाग्राम आश्रमाच्या वतीने चष्मा चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. तक्रारीनुसार 1946 ला जेव्हा महात्मा गांधीजी सेवाग्राम सोडून दिल्लीला गेले, त्यावेळी त्यांच्या नित्य उपयोगी वस्तू स्मारक म्हणून आश्रमात जपून ठेवल्या होत्या आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींचा चष्माही होता.

कोणीतरी दोन मुलांनी बापू कुटीच्या काचेच्या शोकेसमधून महात्मा गांधींचा चष्मा चोरला. त्यांनी चष्म्याचा बराच शोध घेतला, परंतु चष्मा मिळाला नाही. शेवटी  सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे महात्मा गांधीजींचा चष्मा चोरी गेल्याबाबत तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.

सीआयडीने तपासादरम्यान आरोपी कुणाल राजाभाऊजी वैद्य, राहणार हिंद नगर याला अटक केली. तपासाअंती सीआयडीने वर्धा मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात भारतीय दंड विधानाचे कलम 380 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं. याचा निकाल आज लागला. न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केलं आहे.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकिलांनी सरकारतर्फे बरेचशे साक्षीदार तपासले. आरोपी कुणाल वैद्यतर्फे वकील रोशन राठी यांनी कुणालची बाजू मांडली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी ऐ.ऐ.आयचीत यांनी आरोपी कुणालला सदर प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले. कुणाल हा अभियंता असून तो नागपूर येथे सध्या नोकरीला आहे. पण यादरम्यान परदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करणे शक्य झाले नाही.