राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?

| Updated on: Jun 05, 2020 | 8:08 AM

राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, जिम, स्विमिंग पूल, सिनेमागृह, धार्मिक स्थळ बंदच राहणार आहेत. (Mission Begin Again Phase One Two)

राज्यात पुनश्च हरिओम, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘पुनश्च हरिओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन‘चा पहिला आणि दुसरा टप्पा आजपासून एकत्रित सुरु होत आहे. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने आता सशर्त उघडणार आहेत. (Mission Begin Again Phase One Two)

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्यात ‘या’ गोष्टींना परवानगी

पहिला टप्पा – यात सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही

सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.

१. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही
२. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी
३. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2
दुचाकी – केवळ चालक

 तिसऱ्या टप्प्यात ‘या’ गोष्टी शिथील होणार

तिसरा टप्पा – येत्या 8 जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.

पुण्यात आजपासून काय काय सुरु?

महिलांमध्ये खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली पुण्यातील तुळशीबाग, हॉंगकॉंग, मंडई लेन हे ‘पी1-पी2’ म्हणजेच सम-विषम पद्धतीनुसार आजपासून सुरु होणार आहेत. दुकाने 9 ते 5 या वेळेत सुरु राहणार आहेत. (Mission Begin Again Phase One Two)

पुणे महापालिकेच्या नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने सुरु होतील. मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाईझ करणे यासारखे नियम पाळणे क्रमप्राप्त आहे. तब्बल 72 दिवसानंतर दुकानं खुली होणार आहेत. जीवनाश्यक वस्तूंसोबत आता इतरही वस्तू खरेदी करता येणार आहेत.

नवीन आदेशात 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र झाली आहेत. मात्र अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरु राहतील.

हेही वाचा : देशात हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर

तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार आहेत. म्हणजेच वकील, सीए अशा सेवा पुरवणाऱ्या खासगी व्यावसायिकांना आपले ऑफिस 10 टक्के कर्मचारीवर्गासह उघडता येईल. बांधकाम व्यवसायही सुरु राहणार आहेत.

राज्यासह पुण्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, जिम, स्विमिंग पूल, सिनेमागृह, धार्मिक स्थळ बंदच राहणार आहेत. नागरिक आणि व्यावसायिक यांच्याकडून वारंवार मागणी केली जात असली, तरी सलून, ब्युटी पार्लरही तूर्तास उघडणार नाहीत.

याआधी पहिल्या टप्प्यात म्हणजे 3 तारखेपासून पुण्यात उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तूर्तास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना इथे प्रवेशबंदी असेल.

नाईट कर्फ्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.

65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.

कोरोना रुग्णांची संख्येनुसार जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित करावेत. हा कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वया भागातील कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येईल.