Putin in India: पुतीन यांना 21 तोफांची सलामी, अनेक मोठे करार; गेल्या 24 तासांमध्ये मोदी-पुतीन यांच्यात काय घडलं?
Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या भारत दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Putin and Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. तब्बल चार वर्षांनंतर ते भारतात आले आहेत. पुतीन भारतात आल्यापासून त्यांचे वेळापत्रक व्यस्त आहे, त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणांना भेट दिली असून अनेक महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावत अनेक करारांवर स्वाक्षरी केली आहे. प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावर जात पुतीन यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते कारने लोककल्याण मार्गावर गेले. संध्याकाळी दोन्ही नेते डिनरसाठी एकत्र जमले होते. सायंकाळी कोणतीही अधिकृत द्विपक्षीय बैठक झाली नाही.
गेल्या 24 तासांमध्ये काय घडलं?
आज म्हणजे शुक्रवारी पुतीन सर्वप्रथम राजघाटवर गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या बैठक झाली. याबाबत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मोदींनी लिहिले की, ‘विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा झाली. मी युक्रेनमधील संघर्षावर शांततेचा संदेश दिला. तसेच मी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचेही पुतीन यांच्या लक्षात आणून दिले.
रशियात दोन भारतीय दूतावासांचे उद्घाटन
आज दुपारी विविध करारांवर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयु्क्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामधील कझान आणि येकातेरिनबर्ग येथे दोन नवीन दूतावासांच्या उद्घाटनाची माहिती दिली. याबाबत पंतप्रधान म्हणाले की, ‘भारत-रशिया संबंधांचा महत्त्वाचा पैलू हा दोन्ही देशांची संस्कृती आणि लोक हा आहे. हा सांस्कृतिक आणि लोकांमधील संपर्क कायम ठेवण्यासाठी, हे दोन दूतावास उघडण्यात आली आहेत.’
President Putin’s visit will add vigour to India-Russia ties….@KremlinRussia_E pic.twitter.com/NPUSZKAGgA
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2025
भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला हजेरी
दोन्ही देशांमधील विविध करारांवर स्वाक्षरी झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत 2030 पर्यंत चालणाऱ्या आर्थिक सहकार्य करारावर शिक्कामोर्तब झाले. दोन्ही देशांचे अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख या परिषदेला हजर होते.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला रशिया मदत करणार
रशियाने भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प कुडनकुलमला पाठिंबा दिला आहे. तामिळनाडूतील या अणुऊर्जा प्रकल्पातील दोन अणुभट्ट्या कार्यान्वित झाल्या आहेत. चार अणुभट्ट्यांचे बांधकाम सुरू आहे. आता रशिया यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती स्वतः पुतिन यांनी दिली आहे.
