नाशिकमध्ये इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू

| Updated on: Mar 30, 2020 | 8:07 AM

नाशिक-औरंगाबाद रोडवर इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात (Indigo car accident nashik) झाला आहे.

नाशिकमध्ये इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू
Follow us on

नाशिक : नाशिक-औरंगाबाद रोडवर इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात (Indigo car accident nashik) झाला आहे. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे तर तीनजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाशिक येथून आपल्या गावी पैठण तालुक्यातील बिडकीनेला (Indigo car accident nashik) जात होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या भीतीने जाधव कुटुंबानी पैठण येथे आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी गाडीत चालकासह चारजण प्रवास करत होते. यादरम्यान गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. गीता जाधव आणि विराज जाधव असं मृत आई, मुलाचे नाव आहे. तर जखमींमध्ये विराट जाधव, मयूर जाधव आणि कार चालकाचा समावेश आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल (29 मार्च) मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 आणि अहमदनगरमध्ये 2 असे रुग्ण सापडले आहेत. तर नुकतंच नाशिकमध्येही पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये सापडलेला या रुग्णाने कोणत्याही देशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे त्याला संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये आढळलेला हा रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.