नवी मुंबईतील तिन्ही मार्केट, तर पुण्यातील मार्केट यार्ड पुढील आदेशापर्यंत बंद

| Updated on: Apr 09, 2020 | 7:33 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केट 11 एप्रिलपासून अनिश्चित काळापर्यंत (APMC Market close) बंद ठेवण्यात येणार आहे

नवी मुंबईतील तिन्ही मार्केट, तर पुण्यातील मार्केट यार्ड पुढील आदेशापर्यंत बंद
Follow us on

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केट 11 एप्रिलपासून अनिश्चित काळापर्यंत (APMC Market close) बंद ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय एपीएमसी प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी घेतला आहे. तसेच पुण्यातील मार्केट यार्डही उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितलं (APMC Market close) जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले होते. पण जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरु राहावा यासाठी एपीएमसी मार्केट 20 मार्च पासून सुरु करण्यात आले होते. पण येथे ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तसेच बाजारात कुणीही सोशल डिस्टन्सिंग पाळत नव्हते. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे समोर आले होते. तसेच मार्केटमधील एका व्यापाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याने मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मार्केट बंद राहणार आहे.

पुण्यातील मार्केट यार्डही उद्यापासून बंद

पुण्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुण्यातील मार्केट यार्डही उद्यापासून (10 एप्रिल) बंद करण्यात येत आहे. तेथील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हे मार्केट बंद असेल असं सांगितलं जात आहे.

एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण 

नुकतेच एपीएमसी मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात ग्राहक गर्दी करत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली होती. त्यामुळेच व्यापारी संघटनांकडूनही मार्केट बंद करण्याची विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मुंबईत देखील कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. या अनुषंगाने कोरोना या विषाणूचा सामूहिlक संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसी समितीने घेतला आहे.