राष्ट्रवादीच्या ‘या’ विश्वासू आमदाराला विधानसभेचं उपाध्यक्षपद?

| Updated on: Mar 03, 2020 | 8:45 PM

विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना या पदासाठी संधी मिळाली आहे (NCP MLA Narhari Zirwal)

राष्ट्रवादीच्या या विश्वासू आमदाराला विधानसभेचं उपाध्यक्षपद?
Follow us on

मुंबई : विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची नेमणूक सध्या सुरु असलेल्या अधिवेशनातच होणार आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना या पदासाठी संधी मिळाली आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचं नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे (NCP MLA Narhari Zirwal). त्यामुळे उपाध्यक्षपद त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं होतं. मात्र, उपाध्यक्षपदाची जबाबदारी अद्याप कुणालाही देण्यात आलेली नाही. सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी उपाध्यक्षपदाची जबाबदारी नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे (NCP MLA Narhari Zirwal).

मुस्लिम आरक्षणावरुन विसंवाद, मुख्यमंत्री म्हणातात अद्याप चर्चा नाही, तर आरक्षणासाठी आम्ही बांधील, काँग्रेसची भूमिका

कोण आहेत नरहरी झिरवळ?

नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील लोकांचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे. विधानसभेच्या 2004च्या निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह सलग दोनवेळा निवडून येण्या बहुमान त्यांना मिळाला.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी हिमतीनं सांगावं 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार नाही : देवेंद्र फडणवीस