‘बिहारच्या निवडणुकीत स्थलांतरित मजूर मतपेटीतून भाजपविरोधात रोष व्यक्त करतील’

| Updated on: Oct 18, 2020 | 9:10 AM

सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस दल हे कसल्या तरी दबावाखाली वावरत होते. | Sanjay Nirupam

बिहारच्या निवडणुकीत स्थलांतरित मजूर मतपेटीतून भाजपविरोधात रोष व्यक्त करतील
Follow us on

पाटणा: बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यातील स्थलांतरित मजूर भाजपविरोधात मतदान करुन आपला राग व्यक्त करतील, असे मत काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी व्यक्त केले आहे. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून स्टार प्रचारक म्हणून केवळ संजय निरुपम यांचीच निवड केली होती. (Congress leader Sanjay Nirupam on Bihar elections 2020)

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे हे गरीब लोक खूप दुखावले गेले आहेत. लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावांकडे परतत असताना अनेक मजुरांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या सगळ्याबद्दलचा राग ते मतपेटीतून व्यक्त करतील. भाजप आणि नितीश कुमार यांना याचा मोठा फटका बसेल, असे संजय निरुपम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या मुलाखतीत संजय निरुपम यांनी बिहार निवडणुकीत सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या सुरु असलेल्या राजकारणावरही टीकास्त्र सोडले. सुशांत सिंहने आत्महत्या केली होती, हे प्रथमदर्शनी दिसून आले होते. त्यामुळे या प्रकरणाचे बिहार निवडणुकीशी काहीही देणेघेणे नाही. तरीही राजकीय पक्षांकडून या प्रकरणाचा ज्याप्रकारे वापर केला जात आहे, ते दुर्दैवी असल्याचे निरुपम यांनी म्हटले.

मात्र, मुंबई पोलिसांकडून याप्रकरणात तितक्या तत्परतेने कारवाई झाली नाही. वरकरणी मुंबई पोलिसांना याप्रकरणाच्या तपासात फारसा रस नसल्याचे दिसत होते. मुंबई पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे. परंतु, सुशांत प्रकरणात ते कसल्या तरी दबावाखाली वावरत होते. हा दबाव कोणाचा होता, हे मला माहिती नाही. मात्र, या सगळ्यामुळे सुशांतचे चाहते संतापले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची मागणी केली, असे निरूपम यांनी सांगितले.

‘बिहार निवडणुकीत पंतप्रधान मोदी प्रमुख चेहरा असल्यास काँग्रेसला फायदाच होईल’
बिहार निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच भाजपचा प्रमुख चेहरा असेल तर काँग्रेसला याचा फायदाच होईल. ही राज्याची निवडणूक आहे. त्यामुळे याठिकाणी मोदी फॅक्टरचा फारसा परिणाम होणार नाही. गेल्या सहा महिन्यांत आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मोदी सरकारचे पोस्ट लॉकडाऊन धोरण आणि नितीश कुमार सरकारचा अकार्यक्षम कारभार या दोन मुद्द्यांभोवतीच फिरेल, असे संजय निरुपम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

मोदी, शाहांसह फडणवीस करणार बिहारमध्ये प्रचार; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

(Congress leader Sanjay Nirupam on Bihar elections 2020)