शहिदाच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठ गहिवरला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे कर्तव्य बजावत असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज नशिकमधील गोदावरी नदीच्या काठी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता. शहीद मांडवगणेंच्या पार्थिवाजवळ त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठी अश्रूंचा महापूर पाहवयास मिळाला. शहीद निनाद मांडवगणेंची दोन वर्षांची चिमुकली पार्थिवाच्या आजूबाजूलाच होती. […]

शहिदाच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठ गहिवरला!
Follow us on

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे कर्तव्य बजावत असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज नशिकमधील गोदावरी नदीच्या काठी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता. शहीद मांडवगणेंच्या पार्थिवाजवळ त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठी अश्रूंचा महापूर पाहवयास मिळाला.

शहीद निनाद मांडवगणेंची दोन वर्षांची चिमुकली पार्थिवाच्या आजूबाजूलाच होती. अत्यंत गोड आणि गोंडस असलेल्या या चिमुकलीला वयानुसार अजून समज नाही. आपल्यावर केवढं मोठं डोंगर कोसळलं आहे, याची या लहान जीवाला अजून जाणीव नाही. शहीद मांडवगणेंना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या लोकांकडे चिमुकली अत्यंत कुतुहलाने पाहत होती.

निनाद मांडवगणे हे शहीद झाले, त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब लखनौला गेले होते. चिमुकलीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी लखनौ येथे संपूर्ण कुटुंब जमले होते. मात्र, निनाद यांच्या शहीद होण्याची बातमी आली आणि अवघ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शहीद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांची एक मुलगी आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद

जम्मू-काश्मिरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत माहाराष्ट्रचा वीरपुत्र शहीद झाला आहे. नाशिकचे वैमानिक स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. निनाद मांडवगणे यांच्यासह आणखी सहा जवान या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली होती.

नाशिकचे स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांची निवड पुण्यातील एनडीएत झाली आणि त्यानंतर ते 2009 साली हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाले. निनाद यांची पोस्टिंग सध्या श्रीनगरमध्ये होती. तिथेच झालेल्या या दुर्घटनेत निनाद यांना वीरमरण आले.

मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तानकडून सीमावर्ती भागांवर गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानने भरदिवसा भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, भारतीय वायुसेनेने पाकच्या विमानांना पळवून लावले. यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे.