इंधन दरवाढीला 21 दिवसांनंतर ब्रेक, पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर

मुंबईत पेट्रोल 87.14 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.71 रुपये प्रतिलिटर दर आहे.

इंधन दरवाढीला 21 दिवसांनंतर ब्रेक, पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर
| Updated on: Jun 28, 2020 | 10:31 AM

मुंबई : अखेर 21 दिवसांनंतर इंधन दरवाढीला ब्रेक मिळाल्याने वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. आजच्या दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर राहिले आहेत. (Petrol Diesel Price Stable)

मुंबईत पेट्रोल 87.14 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.71 रुपये प्रतिलिटर दर आहे. दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 80.40 प्रतिलिटर दराने विकले जात आहे. सलग 21 दिवस इंधन दरवाढ कायम राहिल्यानंतर 22 व्या दिवशी दर जैसे थे राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.

कालच्या दिवसात पेट्रोल 25 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 21 पैसे प्रतिलिटर महाग झाले होते. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास  9.12 रुपये, तर डिझेल 11.01 रुपयांनी महागले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून इंधन दरवाढ कायम होती. तीन आठवडे सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले होते. आता इंधन दरात घट नसली, तरी भाव स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला.

लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे 16 मार्च ते 5 मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. (Petrol Diesel Price Stable)