कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी

| Updated on: Oct 20, 2020 | 6:46 PM

देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते देशवासियांशी संबोधित करत होते.

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं यश मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. विनामास्क फिरू नका. स्वत:ला आणि कुटुंबीयांना संकटात टाकू नका. अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन करतानाच जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही, अशी सूचनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केली. ते देशवासियांना संबोधित करत होते. (PM Narendra Modi Address to Nation)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करून त्यांना कोरोना संसर्गापासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. पण घराबाहेर पडताना काळजी घ्या. आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ देशातून कोरोनाचं संकट गेलं असं होत नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे थोडीही चूक करू नका. आपल्यासह आपल्या कुटुंबाला संकटात टाकू नका, असं आवाहन मोदींनी केलं. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही. तोपर्यंत कोणतीही हयगय करू नका. कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून लवकरच ही लस सर्वांना मिळेल, असा विश्वासही त्यांनी दिला.

देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. आज देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे. कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत वाढत्या चाचण्या ही एक आपली मोठी शक्ती आहे. सेवा परमो धर्म: च्या मंत्रानं डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी नि: स्वार्थपणे एवढी मोठी लोकसंख्येला सेवा देत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये निष्काळजीपणाची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही, असे समजण्याची ही वेळ नाही, असं ते म्हणाले. (PM Narendra Modi Address to Nation)

त्रिसूत्री लक्षात ठेवा

सध्याचा काळ हा कठिण आहे. त्यातून आपण पुढे जात आहोत. अशा संकटात थोडीसा हलगर्जीपणाही महागात पडू शकतो. त्यामुळे आपला आनंद हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनापासून दूर राह्यचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येकाला लस मिळेल

कोरोनाची लस जेव्हाही येईल, तेव्हा ती प्रत्येक भारतीयाला मिळेल. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. एका-एका व्यक्तीपर्यंत ही लस येईल. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे, असं ते म्हणाले.

कोरोनाच्या लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. इतर संशोधकांप्रमाणेच आपल्या देशातील संशोधकही या कामाला लागले आहेत. कोरोना लसीचं संशोधन प्रगतीपथावर आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोरोना काळातील सातवे संबोधन

कोरोनाच्या काळात सातव्यांदा पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधला. याआधी जनता कर्फ्यू, लॉकडाऊनची घोषणा, लॉकडाऊनमधील वाढ अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे. लाल किल्ल्यावर 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रूपरेखा तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली होती. (PM Narendra Modi Address to Nation)

आठचा मुहूर्त चुकवला

नोटाबंदीच्या विषयापासून जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा अनेक महत्त्वाच्या घोषणांसाठी पंतप्रधानांनी रात्री आठ वाजताचा मुहूर्त निवडला होता. यावेळी मात्र त्यांनी संध्याकाळी सहा वाजताची वेळ निश्चित केली होती. त्यामुळे मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मोदी यांनी अवघे दहा मिनिटंच देशवासियांशी संवाद साधून त्यांना लस येईपर्यंत कोरोनाच्या संकटापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या:

…तरच कोरोनाचं संकट टळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला ‘उपाय’

कार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा

कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे