इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

| Updated on: Feb 11, 2020 | 10:15 PM

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Follow us on

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे (PCPNDT ACT on Nivrutti Maharaj Indurikar ). त्यांच्यावर आपल्या किर्तनात मुलगा प्राप्तीसाठीच्या उपायांवर ‘ऑड-इव्हन’चं वक्तव्यं केल्याचा आरोप आहे. याविरोधात पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इंदुरीकर यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”


भागवत पुराणाच्या 10 व्या स्कंदात सांगितलं आहे की पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. पाचव्या महिन्यात त्वचा येते. सहाव्या महिन्यात बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीवर फिरलं तर मुलगा होतो आणि तो जर डाव्या कुशीवर फिरला तर मुलगी होते, असंही त्यांनी आपल्या किर्तनात म्हटलं.

‘संबंधित विधान पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन’

या प्रकरणावर बोलताना आरोग्य विभागाच्या राज्य समूचित प्राधिकारी आणि अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो हे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन आहे. आम्ही इंदुरीकर महाराजांचा संबंधित व्हिडीओ तपासून त्यांच्या वक्तव्यांची खातरजमा करु. जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सुचना दिल्या जातील.”

‘आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय’

अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर म्हणाले, “सल्लागार समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यात संबंधित वक्तव्य करुन पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतूद काय आहे?

पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 22 नुसार गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरात करण्यास बंदी आहे. छापील पत्रक, संवाद, मेसेज, फोन किंवा इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जाहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22, कलम 22 (3) चा भंग झाल्यास संबंधित दोषींना 3 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

PCPNDT ACT action on Nivrutti Maharaj Indurikar