CAA वर प्रियांका चोप्राचं ट्वीट, मात्र अनेक कलाकार अजूनही गप्प

अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) ट्विटरच्या माध्यमातून या विषयावर आपलं मत मांडलं, तसेच जामिया विद्यापिठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला

CAA वर प्रियांका चोप्राचं ट्वीट, मात्र अनेक कलाकार अजूनही गप्प
| Updated on: Dec 19, 2019 | 11:27 PM

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशातील प्रत्येक शहरात या कायद्याविरोधात निदर्शनं केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत आंदोलन करण्यात आलं, तर काही ठिकाणी हिंसाही पाहायला मिळाली (Protest Against CAA). सामान्य नागरिकच नाही तर बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याविरोधात आवाज उठवला. 15 डिसेंबरला दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा या कलाकारांनी कठोर शब्दात निषेध केला आहे(Protest Against CAA).

अभिनेत्री परिणिती चोप्रा, ऋचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, जावेद अख्तर, विशाल भारद्वाज, फरहान अख्तर आणि अनुराग कश्यपने जामियाच्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला. यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) ट्विटरच्या माध्यमातून या विषयावर आपलं मत मांडलं, तसेच जामिया विद्यापिठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला (Priyanka Chopra tweet ).

‘शिक्षण प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे. शिक्षणानेच त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपण त्यांना आवाज उठवण्यासाठी मोठं केलं आहे. लोकशाही असलेल्या देशात शांतीप्रिय पद्धतीने उठवलेल्या आवाजाला हिंसेने उत्तर देणं चुकीचं आहे. प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे आणि उठणारा प्रत्येक आवाज भारताला बदलण्यासाठी सहाय्य करेल’, असं ट्वीट प्रियांकाने केलं.

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भूकंप आला आहे. त्यावरुन बॉलिवूडच्या काही कलाकारांनी ठोस भूमिका मांडली मात्र सिनेसृष्टीतील काही बड्या चेहऱ्यांनी याबाबत मौन बाळगणं पसंत केलं आहे. अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान यांसारख्या बड्या कलाकारांनी अद्यापही CAA वर कुठलीही प्रतिक्रिया मांडलेली नाही.