सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर, बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय

| Updated on: May 17, 2020 | 10:30 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या (Pune university exam) परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर, बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय
Follow us on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या (Pune university exam) परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 46 हजार इतकी आहे (Pune university exam).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबात परिपत्रक जारी केलं आहे. “विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणांची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समितींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय होईल”, असं डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले आहेत.

बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय झाला

बॅकलॉग परीक्षेबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षाही लेखी होणार आहे. निकालासाठी 50 टक्के अंतर्गत गुण आणि 50 टक्के अंतिम सत्राची परीक्षा याचे मूल्यमापन केलं जाईल. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट यासाठी व्यवहार्यता तपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल. अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थी पुढील वर्षासाठी पात्र ठरणार आहेत. बॅकलॉगसाठी पुढील सत्रात परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावं लागेल.

कोरोनामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तसचे राज्य सरकारने कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने सर्व विद्यापीठांना शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जावी, असे निर्देश दिले होते.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फटका बसेल. त्यामुळे पुणे विद्यापीठाने पारंपरिक लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | 17 मेनंतर पुण्यात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध, 97 टक्के भागात जास्त सुविधा सुरु : आयुक्त