असला पाऊस नको रे बाबा; नाशिकमध्ये दुपारपासून संततधार!

नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचे तडाखे देऊनही पाऊस अजून थांबायला तयार नाही. आज दुपारपासून शहर परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.

असला पाऊस नको रे बाबा; नाशिकमध्ये दुपारपासून संततधार!
नाशिकमध्ये दुपारपासून पाऊस सुरू आहे.
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 4:14 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचे तडाखे देऊनही पाऊस अजून थांबायला तयार नाही. आज दुपारपासून शहर परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्याकडे सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात अक्षरशः कहर केला. त्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने गंगापूर धरण समूह भरला. गोदावरी नदीला दोन वेळेस पूर आला. मनमाड, नांदगाव तालुक्यात दोन-दोनदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामाचे पीक उद्धवस्त झाले. आता त्यानंतर राज्यभरातून मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतरही पुन्हा एकदा रविवारी दुपारपासून नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळा सुरू झाल्याचा फिल शहरवासीयांना येत आहे. आता मान्सूनने काढता पाय घेतल्या म्हटल्यानंतर अनेकांनी आपल्या छत्र्या आणि रेनकोट घरात ठेवले होते. त्यांना ते पुन्हा बाहेर काढावे लागले. दरम्यान, हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात आज 17 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. खरे तर 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मंगळवार आणि बुधवारी रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.

प्रचंड नुकसान

अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यात यावर्षी अक्षरशः थैमान घातले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीचे भयावह आकडे आता समोर येत आहेत. जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवचे पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी मदत म्हणून 8957.01 लाखांची मागणी करण्यात आली आहे. बागायत पिकासाठी 4367.98 लाखांच्या निधीची मागणी केली आहे. वार्षिक फळपिकांसाठी 18.35 लाख, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 1377.99 लाखांची अशी एकूण 147 कोटी 21 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

इतर बातम्याः 

65 वर्षांच्या आजीचा कुऱ्हाडीने वार करून नाशिकमध्ये खून; काम कर म्हटल्याने नातवाचा राग अनावर

Gold Special: खणखणीत परतावा देणारा हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!