रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे

| Updated on: Sep 25, 2020 | 5:33 PM

राजेश टोपे हे पू्र्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.

रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे
Follow us on

नागपूर: कोरोनावर रेमडेसीवीर हे इंजेक्शन प्रभावी असल्याने हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनबाबत धक्कादायक विधान केलं आहे. रेमडेसीवीर हे इंजेक्शन काही संजीवनी नाही. या इंजेक्शनमुळे रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही, अशी धक्कादायक कबुली राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपे यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Health Minister Rajesh tope on Corona patient Increase)

राजेश टोपे हे पू्र्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं. नागपूरात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. पण रेमडेसीवीर ही काही संजीवनी नाही, त्याने रुग्णांचा जीव वाचतोच असं नाही. ज्याला गरज आहे त्यालाच ते इंजेक्शन द्यायला हवं, रेमडेसीवीर इंजेक्शन कुणाला द्यायचं, याबाबत कोव्हिड टास्कफोर्समार्फत राज्यातील सर्व डॉक्टरांना गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

यावेळी त्यांनी नागपूर कोरोनाचं हॉटस्पॉट बनल्याची कबुली देत नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मेडिकलमध्ये कोव्हिडचे 500 बेड्स वाढवण्याच्या आणि एम्समध्ये 500 ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या शिवाय जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी डब्ल्युसीएल आणि रेल्वेचे रुग्णालय कोव्हिड रुग्णांसाठी वापरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच रुग्णांकडून भरमसाठ बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा

नागपुरात ‘रेमडेसीवीर’चा मोठा तुटवडा उद्भवला आहे. ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट होत आहे. या इंजेक्शनची जास्त दराने विक्री होत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. मेडिकल आणि मेयो या सरकारी रुग्णालयांमध्येही ‘रेमडेसीवीर’चा तुटवडा आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांना ना वेळेवर उपचार मिळत आहेत नाही औषधं अशी स्थिती आहे. (Health Minister Rajesh tope on Corona patient Increase)

नागपुरात 71,616 कोरोना रुग्ण

नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. सध्या नागपुरात 71 हजार 616 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 53 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2261 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.87 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 74.59 टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट 29.1 दिवस इतका आहे.

 

संबंधित बातम्या:

महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली

(Health Minister Rajesh tope on Corona patient Increase)