मशिदी उघडणार म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते? नाशिकच्या साधू-महंतांचा सवाल

| Updated on: Aug 27, 2020 | 4:23 PM

नाशिकच्या साधू महंतांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली (Sadhus and Mahants of Nashik criticize Imtiyaz Jalil).

मशिदी उघडणार म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते? नाशिकच्या साधू-महंतांचा सवाल
Follow us on

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र, नाशिकमध्ये साधू, महंतांनी एकत्र येत 29 ऑगस्टपर्यंत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करु, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यावेळी साधू महंतांच्या प्रतिनिधींनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली (Sadhus and Mahants of Nashik criticize Imtiyaz Jalil). मशिदी उघडणार असं म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते, असा सवाल या साधू महंतांनी केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाशिकमधील साधू, महंत आणि धर्माचार्य यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. यात दिगंबर आखाडा , निर्वाणी आखाडा, कैलास मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी केली. तसेच मंदिरं न उघडल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. साधू, महंतांच्यावतीने अध्यात्मिक समनव्य आघाडीचे समन्वय आचार्य तुषार भोसले यांनी भूमिका मांडली.

मशिदी उघडणार असं म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवालही या साधू महंतांनी विचारला. एमआयएम आणि सरकारची मिलीभगत आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला.

राज्यात मदिरा सुरु आहे, पण मंदिरं मात्र बंद आहेत, असं मत मांडत साधू महंतांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ अशी हाकही यावेळी देण्यात आली. शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी आहे, असं म्हणत अध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. विरोधी पक्ष भाजपचाही या घंटानाद आंदोलनाला पाठिंबा आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गणेश विसर्जनानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं तुषार भोसले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असं म्हणत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. औरंगाबादचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला इशारा दिला.

“जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

Sadhus and Mahants of Nashik criticize Imtiyaz Jalil