संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष 10 लाखांची खंडणी घेताना अटकेत

संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष 10 लाखांची खंडणी घेताना अटकेत

सांगली: सहाय्यक निबंधकाकडून खंडणी स्वीकारताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सुयोग औंधकर असं अटक केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी सुयोग औंधकरने खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

सुयोग औंधकरने सहायक निबंधक आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळेकडे पैशाची मागणी केली होती. डफळे हे काल शुक्रवारी 10 लाख रुपये खंडणी म्हणून औंधकरला देणार होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून सुयोग औंधकरला अटक केली.

सुयोग औंधकरला अधिकाऱ्याकडून 10 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर त्याचा साथीदार कृष्णा जंगमलाही पोलिसांनी अटक केली.  इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सुयोग औंधकरने कृष्णा जंगममार्फत माहिती अधिकारातून काही माहिती मिळवल्याचं सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला सांगितलं होतं. त्याआधारेच औंधकरने 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

Published On - 2:18 pm, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI