Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!

| Updated on: Jul 03, 2020 | 8:37 PM

न्यायालयाने इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (Court summons Indorikar Maharaj in PCPNDT Case).

Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!
Follow us on

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरुन इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला. यानंतर न्यायालयाने इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (Court summons Indorikar Maharaj in PCPNDT Case). इंदोरीकर महाराजांना आता स्वत: हजर होत वकीलांमार्फत आपली बाजू मांडावी लागणार आहे.

निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे आपल्या खास विनोदी शैलीत कीर्तन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या ते न्यायालयीन फेऱ्यात अडकले आहेत. इंदोरीकर महाराजांवर आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीचे जाहीर वक्तव्य केल्याचा आरोप आहे. जिल्हा आरोग्य विभागाने संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय. 26 जून रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

इंदोरीकरांच्या विधानानंतर अनेक सामाजिक संघटनांनी तक्रार दाखल केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. त्यानंतर आता न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुत्रप्राप्तीसाठी जाहिर वक्तव्य आणि त्याचा प्रचार प्रसार केल्याच्या आरोपावरुन इंदोरीकरांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

इंदोरीकरांविरोधात 26 जून रोजी संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला. यानंतर न्यायालयाने इंदोरीकरांना हजर राहण्याबाबत समन्स बजावले. यासाठी अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी न्यायालयाचे आभार मानले. ही लढाई व्यक्तिगत नसून सामाजिक असल्याचे गवांदे यांनी सांगितलं. तसेच इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी जे अनाठायी आरोप केले त्यांना ही जोरदार चपराक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. इंदोरीकर समर्थकांनी आंदोलनाचा इशारा देत हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी तहसिलदारांना निवेदन दिलं होतं. आता मात्र ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने समन्स हाती पडल्यावर बोलू अशी भूमिका समर्थकांनी घेतली आहे. इंदुरीकर महाराजांकडून प्रसारमाध्यमांपूढे कोणतीही भूमिका अद्याप मांडण्यात आलेली नाही. दरम्यान इंदोरीकर महाराज यांना कोर्टात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

संबंधित व्हिडीओ:

Court summons Indorikar Maharaj in PCPNDT Case