शाहरुख खानच्या सासूबाईंच्या बंगल्याला तीन कोटींचा दंड

| Updated on: Feb 28, 2020 | 12:05 PM

अलिबागमधील थळ परिसरात असलेल्या सविता छिब्बर यांच्या आलिशान फार्महाऊसमुळे भाडेकरार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शाहरुख खानच्या सासूबाईंच्या बंगल्याला तीन कोटींचा दंड
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानच्या सासूबाई सविता छिब्बर यांच्या फार्महाऊसला दंड ठोठावण्यात आला आहे. अलिबागमध्ये असलेल्या छिब्बर यांच्या बंगल्याला तीन कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे. भाडेकरार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप छिब्बर यांच्यावर आहे. (Shahrukh Khan mother in law bungalow fine)

शाहरुखच्या सासूबाई अर्थात निर्माती गौरी खान यांच्या मातोश्री सविता छिब्बर आणि बहीण नमिता छिब्बर या ‘देजाऊ फार्म्स प्रा. लि.’च्या संचालिका आहेत. अलिबागमधील थळ परिसरात छिब्बर मायलेकींच्या मालकीचं आलिशान फार्महाऊस आहे. 2008 मध्ये हा बंगला बांधण्यात आला होता.

या बंगल्यावर बॉलिवूडमधील अनेक पार्टीज् झाल्या आहेत. यामध्ये शाहरुख खानच्या 52 व्या बर्थडे पार्टीचाही समावेश आहे. 1.3 हेक्टरवर पसरलेल्या या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही आहे.

जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी 29 जानेवारी 2018 रोजी छिब्बर यांच्या बंगल्याला नोटीस पाठवल्याचं ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राच्या बातमीत म्हटलं आहे. प्लॉट खरेदी केल्यानंतर रायगडच्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी 13 मे 2005 रोजी शेतीची परवानगी दिल्याचं नोटिशीत लिहिलं होतं.

प्लॉट खरेदी करताना मूळ जागेवर असलेलं फार्महाऊस तोडून त्याजागी नवीन फार्महाऊस बांधण्यात आलं होतं. हे ‘बॉम्बे टेनन्सी अॅक्ट’ म्हणजेच भाडेकरार कायद्याच्या कलम 63 चं उल्लंघन असल्याचं नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार फार्महाऊसच्या मालकांना समन्स बजावण्यात आलं. त्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी काढलेल्या ऑर्डरमध्ये 3 कोटी 9 लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले. (Shahrukh Khan mother in law bungalow fine)

याआधी, अलिबागमधील शाहरुखचा बंगलाही अडचणीत आला होता. शाहरुखच्या अलिबागमधील फार्महाऊसला इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या सासूबाईंच्या मागेही शुक्लकाष्ठ लागलं आहे.