Solapur Operation Zero Corona | कोरोनाला घेरण्याचं लक्ष्य, सोलापूर पोलिसांचं ऑपरेशन ‘झिरो कोरोना’

| Updated on: Jul 25, 2020 | 5:41 PM

सोलापुरात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपलं कर्तव्य तर बजावलं, शिवाय शहरातील झपाट्यानं वाढणारा प्रभाग ऑपरेशन 'झिरो कोरोना'अंतर्गत कोरोनामुक्त केला.

Solapur Operation Zero Corona | कोरोनाला घेरण्याचं लक्ष्य, सोलापूर पोलिसांचं ऑपरेशन झिरो कोरोना
Follow us on

सोलापूर : पोलीस म्हंटलं की, लाठ्या काठ्या, आरडाओरड आलीच (Solapur Police Operation Zero Corona). मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरुन जी कामगिरी केली, ते राज्यातील जनता कधीच विसरणार नाही. इकडे सोलापुरात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपलं कर्तव्य तर बजावलं, शिवाय शहरातील झपाट्यानं वाढणारा प्रभाग ऑपरेशन ‘झिरो कोरोना’अंतर्गत कोरोनामुक्त केला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे (Solapur Police Operation Zero Corona).

12 एप्रिलला सोलापुरात कोरोनाचा शिरकाव

सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊनमध्ये रुग्णवाहिका, तर अनलॉकमध्ये इतर वाहनांबरोबरच रुग्णवाहिकेच्या सायरनचेच आवाज येत आहेत. राज्याच्या अन्य शहरांच्या प्रमाणेच सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मार्चमध्ये कोरोनाने हाथपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एक अनामिक भीती शहरवासियांच्या मनात बसली. सारं काही ठप्प झालं. यंत्रमागाची धडधड थांबली. त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांची रोजीरोटी थांबली. विडी वळणाऱ्या हजारो बायकांचे हाथ विसावले, धावणार शहर आणि जिल्हा थांबलं, रस्त्यावर दिसतं होते ते फक्त रुग्णवाहिका, पोलीस आणि पीपीई किट परिधान करुन सर्वे करणारे आरोग्यसेवक.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

प्रभाग क्रमांक 19 कोरोनमुक्त

12 एप्रिलनंतर एकेक करत कोरोनाचा शिरकाव कामगारबहुल असलेल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिरकाव झाला. विनायक नगर, गवळी वस्ती, देसाई नगर या भागात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. एकेक करत ही संख्या 75 वर गेली, तर मृतांची संख्या 7 झाली होती. दाटलोकवस्ती, स्वच्छतेचा अभाव, विडी कामगार, यंत्रमाग कामगार असल्यामुळे आधीच आरोग्याच्या तक्रारी असल्यामुळे हीच स्थिती राहिली. तर, परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची चिन्ह होती. मात्र, सोलापूर शहर पोलिसांनी कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणलं. आता प्रभाग क्रमांक 19 हा कामगारबहुल भाग कोरोनमुक्त झाला आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

शहरात या प्रभागात कोरोना संसर्ग सुरु असताना शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा भीती पोटी लोक बाहेर तपासणीसाठी येत नव्हते. काहींनी अंगावर काढलं, तर काहींना शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांना सुद्धा मर्यादा येत होत्या. त्यामुळे लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते (Solapur Police Operation Zero Corona).

कोणतीही चळवळ, जनतेच्या सहभागाशिवाय सहज शक्य, हे हेरुन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी प्रभागातील चारही नगरसेवकांची एक समिती गठीत केली. शिवाय, प्रभागातील तरुण पोलीस मित्र, स्वयंसेवक यांच्या मदतीने रोज लोकांचे समुपदेशन सुरु ठेवलं. शिवाय, आरोग्याची तपासणी सुरु केली, थोडाही संशय वाटला तर उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये कुणी बाहेर फिरकलं नाही. औषधं हवी असल्यास, दवाखान्याला जायचे असल्यास नगरसेवकांनी त्यांच्या संयंसेवकांमार्फत त्यांची व्यवस्था केली. लागेल त्याला घरपोच किराणा पुरवठा केला, अर्थात यात पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली.

सोलापूर पोलिसांनी दाखवून दिलं की अवघड काहीच नसतं

कामगार बहुल, आधीच आरोग्याच्या तक्रारी यामुळे अशा भागात आरोग्य विभाग आणि इतर प्रशासनाला अडचणी येत होत्या. मात्र, रोज उन्ह, वारा, पाऊस अशा खडतरवेळी सुद्धा आपली सेवा बजावणाऱ्या पोलिसांनी लोकांना विश्वासात घेऊन केलेल्या नियोजनामुळे अवघड असं काहीच नसतं हे दाखवून दिलं.

या काळात पोलिसांना सुद्धा कोरोनाचा सामना करावा लागला. कोरोना नियंत्रणासाठी राबराब राबणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर काम करावं लागलं. मात्र, हिम्मत हरली नाही, आज एक प्रभाग कोरोनमुक्त केला. दुसरा कोरोनामुक्तीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आला आहे.

सोलापुरात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती शहरवासियांना कळली, तो दिवस कोणीही विसरणार नाही. कोरोना संसर्गाने बाधित झालेले रुग्ण बरे होऊन बाहेर पडत आहेत. दुर्दैवाने काहींचा बळी गेला. आज मात्र हळूहळू परिस्थिती बदलते आहे. याच ‘झिरो कोरोना’ प्रभागाचे अनुकरण इतरत्र सुरु आहे.

“रक्षक दुर्बलांचे, सेवक दुरितांचे, सोबती दुःखितांचे, आम्ही पोलीस सारे, साथी समाजाचे”, यानुसार पोलिसांनी घेतलेली ही मेहनत संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहेच, शिवाय पोलीस दलाची मान उंचावणारीही आहे.

Solapur Police Operation Zero Corona

संबंधित बातम्या :

घड्याळावरुन लोकेशन ट्रॅकिंग, सकाळी 6 वाजता धडक, 9 कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका

राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू