दारु पिऊन आईला मारहाण, सैनिक मुलाकडून बापाची हत्या

दारु पिऊन आईला मारहाण, सैनिक मुलाकडून बापाची हत्या

मालेगाव, नाशिक : वडील नेहमी दारू पिऊन आई आणि कुटुंबीयांना मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याने सैनिक मुलाने बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगावातील टेहेरे गावात घडली. या प्रकरणी पोलिसांना मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मालेगाव तालुक्यातील टेहेरे येथील रहिवासी प्रकाश बोरसे यांचा मृतदेह 15 तारखेला गावातील रिक्षा थांब्याजवळ संशयास्पद स्थितीत सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

शवविच्छेदनाच्या अहवालात प्रकाश यांना धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचं समोर आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली. प्रकाश यांची हत्या त्यांचाच लहान मुलगा ज्ञानेश्वर याने केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर छावणी पोलिसांनी मुलगा ज्ञानेश्वर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश यांचा मोठा मुलगा समाधानलाही पण अटक केली. हत्या केल्यानंतर समाधानने पुरावा नष्ट केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुन्हा करण्यासोबतच पुरावे नष्ट करणं आणि आरोपीला मदत करणं हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे बापाच्या हत्येप्रकरणी दोन्ही मुलांवर कारवाई करण्यात आली आहे.

Published On - 5:36 pm, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI