यू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ‘रेसिंग बाईक’ची चोरी

| Updated on: Feb 21, 2020 | 4:46 PM

नागपुरात एक अल्पवयीन प्रेमवीर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्‍क चोर बनला.

यू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रेसिंग बाईकची चोरी
Follow us on

नागपूर : गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी कोण काय शक्‍कल लढवेल, याचा नेम नाही. नागपुरात एक अल्पवयीन प्रेमवीर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्‍क चोर बनला. तिचं प्रेम मिळवण्यासाठी त्याने यु-टूबवरून चोरीचं प्रशिक्षण घेतलं. आरोपीने साधी-सुधी नव्हे तर थेट ‘रेसिंग बाईक’ची चोरी केली (Stealing of racing bikes to impress lover in Nagpur). नागपूर पोलिसांनी या प्रेमवीर चोरट्याला अटक केली आहे.

आरोपी प्रेमवीर चोरट्याकडून पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन महागड्या रेसिंग बाईक जप्त केल्या आहेत. चोरी करण्यामागील कारण ऐकूण पोलीसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे सुटल्यानंतरही ‘प्रेयसीसाठी काय पण’ असाच या प्रेमवीर चोराचा तोरा आहे.

काही दिवसांपूर्वी रविंद्र डोंगरे यांची दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून दीड लाख रुपयांची दुचाकी चोरीला गेली. या चोरीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दाभा परिसरात गस्त घालणाऱ्या गिट्टीखदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता त्यानं केटीएम दुचाकी दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून हॅण्डल लॉक तोडून बाईक चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे गाडी चालवण्याची हौस झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने बाईक बेवारसपणे सोडूनही दिली.

आरोपी प्रेमवीरानं मागील 3 महिन्यात 3 रेसिंग बाईकची चोरी केली. तो चोरलेल्या बाईकवर काही दिवस प्रेयसीला फिरवायचा. हौस फिटली की बाईक बेवारस स्थितीत टाकून द्यायचा. त्यासाठी त्यानं यू-ट्‌यूबवरून दुचाकी हॅण्डल लॉक तोडण्याचे धडे गिरवले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 30 हजारांची दोन वाहनं आणि वाडीतून 1 लाख रुपयांचं एक वाहन असे एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचे 3 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या अल्पवयीन प्रेमवीर आरोपीवर आतापर्यंत 14 गुह्यांची नोंद आहे, अशी माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गांगुर्गे यांनी दिली.

Stealing of racing bikes to impress lover in Nagpur