डोंबिवलीत हिरवा पाऊस, सुभाष देसाईंचं आदित्य ठाकरेंकडे बोट

| Updated on: Feb 05, 2020 | 11:17 AM

डोंबिवलीतील प्रदूषणाचा विषय पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अखत्यारित हा विषय येतो, असं सुभाष देसाईंनी स्पष्ट केलं

डोंबिवलीत हिरवा पाऊस, सुभाष देसाईंचं आदित्य ठाकरेंकडे बोट
Follow us on

नांदेड : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे डोंबिवलीकरांचं जगणं कठीण झालं आहे. हिरवा पाऊस, लाल पाणी, गणेशमूर्ती काळवंडण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत समोर येत आहेत. यासाठी पर्यावरण विभाग जबाबदार आहे, असं म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai on Dombivali Pollution) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे चेंडू टोलवला आहे.

‘डोंबिवलीतील प्रदूषण प्रकरणात कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. मी वारंवार हा विषय मांडलेला आहे. पर्यावरण विभाग आणि खासकरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अखत्यारित हा विषय येतो. जे रासायनिक कारखाने प्रदूषण निर्माण करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे हरित लवाद आणि उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, त्यांचं पालन झालं पाहिजे.’ असं सुभाष देसाई म्हणाले.

‘विकास झाला पाहिजे, उद्योगही आले पाहिजेत, पण निसर्गाची हानी, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेहमीच दृष्टीकोन राहिला आहे, हे शासनाचं धोरण असल्यामुळे कारवाई व्हायला पाहिजे. डोंबिवली प्रकरणी प्रदूषण मंडळ आणि पर्यावरण विभागाशी हा विषय चर्चेला घेणार आहे, असं सुभाष देसाईंनी नांदेडमध्ये ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

कारखान्यातील जल आणि वायू प्रदूषणामुळे डोंबिवलीकरांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डोंबिवलीत हिरवा पाऊस पडण्याचा प्रकार बऱ्याचदा समोर येतो. मागच्याच वर्षी एमआयडीसीतील दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं आणि लाल रंगाचं पाणी, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत.

डोंबिवली एमआयडीसीमधील ‘प्रोबेस कंपनी’त गेल्या वर्षी 26 मे रोजी भीषण स्फोट झाला होता. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीचे मालक असलेल्या वाकटकर यांची दोन्ही मुलं, सून यांच्यासह एकूण 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

प्रोबेसमधील स्फोटामुळे डोंबिवलीच्या मानवी वस्तीत असलेल्या कंपन्या हलवाव्यात, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानुसार फडणवीस सरकारमध्येही उद्योगमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुभाष देसाईंनी या कंपन्या स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. फडणवीस सरकार जाऊन ठाकरे सरकार आलं, उद्योगमंत्रिपद देसाईंकडेच आहे, मात्र अजूनही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.

‘कारखानदारांच्या संघटनांशी आम्ही बोललो पण त्यांनी स्थलांतरास नकार दिला. त्यामुळे आता शासन एकतर्फी निर्णय घेण्याचा विचार करत आहे. पर्यायी जागाही शासनाने शोधली असल्याची माहिती सुभाष देसाईंनी दिली.

Subhash Desai on Dombivali Pollution