रशियन ब्युटी क्वीनसोबत लग्नासाठी राजघराणं सोडलं, वर्षभरातच घटस्फोट

| Updated on: Jul 25, 2019 | 5:25 PM

आता दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. याच आठवड्यात मलेशियातील स्थानिक मीडियामध्ये याबाबतचं वृत्त देण्यात आलंय. सुल्तान मोहम्मद-5 (Sultan Muhammad V) आणि रिहाना ओकसाना वोवोदीना (Oksana Voevodina) यांच्या घटस्फोटाची जगभर चर्चा आहे.

रशियन ब्युटी क्वीनसोबत लग्नासाठी राजघराणं सोडलं, वर्षभरातच घटस्फोट
Follow us on

क्वालालंपूर, मलेशिया : प्रेमासाठी काहीही करणारी माणसं या जगात आहेत. अशीच एक स्टोरी मलेशियामधील केलातनचे माजी राजा सुल्तान मोहम्मद-5 (Sultan Muhammad V) यांची आहे. मिस मॉस्को राहिलेली रिहाना ओकसाना वोवोदीनासोबत (Oksana Voevodina) लग्न करण्यासाठी राजघराणं सोडलं. पण आता दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. याच आठवड्यात मलेशियातील स्थानिक मीडियामध्ये याबाबतचं वृत्त देण्यात आलंय. सुल्तान मोहम्मद-5 (Sultan Muhammad V) आणि रिहाना ओकसाना वोवोदीना (Oksana Voevodina) यांच्या घटस्फोटाची जगभर चर्चा आहे.

‘न्यू स्ट्रेट्स टाइम्स’च्या वृत्तानुसार, 1 जुलै रोजी दोघांचा घटस्फोट झालाय. अत्यंत गुप्त पद्धतीने हा घटस्फोट करण्यात आला. या दाम्पत्याला बाळ झाल्यानंतर काही आठवड्यातच घटस्फोट झाला. सिंगापूरमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

 

मिस मॉस्कोने सुल्तानसोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता. यानंतर मिस मॉस्कोला रिहाना ओकसाना पेट्रा हे नवं नाव देण्यात आलं. मलेशिया हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे या लग्नावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली. या रशियन ब्युटीची महाराणी होण्याची वेळ आली तेव्हा राजेशाहीमध्ये खळबळ माजली. राजाने मॉडल तरुणीशी लग्न केल्याबाबत अनेक वाद सुरु झाले.

या सर्व वादांमुळे सुल्तान स्वतःच्या देशात परतल्यानंतर त्यांनी राजाची गादी सोडण्याचा निर्णय घेतला. 1957 मध्ये इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणीही अशा प्रकारे राजाची गादी सोडली नव्हती. त्यामुळे ही एक मोठी घटना मानली जाते.

 

मिस मॉस्कोने नुकतंच इंस्टाग्राम पोस्टद्वारे बाळ झाल्याचीही माहिती दिली होती. मिस मॉस्को आणि पती मोहम्मद यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे. वोवोदीनाचं लग्न जून 2018 मध्ये झालं होतं. लग्नाचे दोन समारंभ झाले. 7 जूनला एक समारंभ मुस्लीम पद्धतीने, तर दुसरा मॉस्कोमध्ये झाला होता.

 

पतीसोबत भेट कशी झाली आणि लव्ह स्टोरी पुढे कशी सरकली याबाबतही वोवोदीनाने सांगितलंय. 2017 ला युरोपमध्ये असताना दोघांची भेट झाली, बराच वेळ गप्पा झाल्यानंतर एकमेकांचा नंबर घेतला. यानंतर संवाद वाढत गेला आणि दोघे लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहिले. याचदरम्यान वोवोदीनाला अमेरिकेत मॉडलिंगची संधी आली. पण मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नको, असं सांगत सुल्तानने तिला मलेशियाचं निमंत्रण दिलं.

यानंतर दोघांनी लग्न केलं. पण हे लग्न मुस्लीमबहुल देशात लगेच वादात सापडलं. रशिया तरुणी महाराणी होण्याबाबत चर्चा सुरु झाली तेव्हा राजेशाही प्रथेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.