‘सुशांतला न्याय द्या’, बिहारच्या सभेत घोषणाबाजी; फडणवीसांनी जोडले हात

| Updated on: Oct 17, 2020 | 6:41 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बिहारमध्ये तळ ठोकून असून भाजप-जेडीयूच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

सुशांतला न्याय द्या, बिहारच्या सभेत घोषणाबाजी; फडणवीसांनी जोडले हात
Follow us on

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बिहारमध्ये तळ ठोकून असून भाजप-जेडीयूच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. मात्र, या प्रचारावेळी त्यांना एक वेगळाच अनुभव आला आहे. फडणवीस हे एका सभेला आले असता सुशांतसिंह राजपूतला न्याय द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे फडणवीसांनी उभे राहून हात जोडले आणि पुन्हा खाली बसले. (Sushant Rajput Posters In devendra fadnavis rally at Bihar)

गोपालगंज येथे भाजपचे उमेदवार सुभाष सिंह यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर एक जनसभा आयोजित केली होती. या सभेला बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या सभेला जेडीयूचे नेतेही उपस्थित होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, सभेला सुरुवात होताच काही लोकांनी सुशांतसिंह राजपूतचे पोस्टर ऊंचावून जोरदार घोषणाबाजी केली. सुशांतला न्याय द्या, रिया चक्रवर्ती आणि गँगला फाशी द्या, अशा घोषणा देत सभेतील लोक उभे राहिले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता.

हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर फडणवीस स्टेजवर उभे राहिले आणि त्यांनी सर्वांना हात जोडला. त्यानंतर ते काहीही न बोलता खाली बसले. त्यानंतर फडणवीस यांनी भाषणाला जोरदार सुरुवात केली. यावेळी त्यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवींवर घणाघाती टीका केली. लालू-राबडी यांच्या 15 वर्षाच्या सत्ताकाळात बिहारची पुरती वाट लागली. या 15 वर्षात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली. अत्याचार वाढले, जंगल राज निर्माण झाले, अशी टीकाही त्यांनी केली. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करून सुशासनाचा आदर्श निर्माण केल्याचा दावाही त्यांनी केला. (Sushant Rajput Posters In devendra fadnavis rally at Bihar)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये तुतारी वाजवणारा मावळा, आता मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचं चिन्ह ठरलं !

प्रकाश आंबेडकर बिहार विधानसभेच्या मैदानात!, ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी’सोबत हातमिळवणी

(Sushant Rajput Posters In devendra fadnavis rally at Bihar)