आक्रीतच घडले, विमानाने तेरा तास प्रवास केला, अन् जेथून उडाले तिथंच रिर्टन, काय झाला घोटाळा पाहा

दुबईच्या विमानतळावरून उड्डाण केलेले एक विमान तब्बल तेरा तासांच्या प्रवासानंतर पुन्हा माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याने या विमानातील प्रवासी प्रचंड बुचकळ्यात सापडले आहे, प्रवाशांना शक्ती कपूरच्या 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' चा सीन आठवला...

आक्रीतच घडले, विमानाने तेरा तास प्रवास केला, अन् जेथून उडाले तिथंच रिर्टन, काय झाला घोटाळा पाहा
FILE PHOTO: Emirates airliners
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 31, 2023 | 11:02 AM

दुबई : सध्या विमानप्रवासात प्रवासी प्रवास कमी आणि गडबड घोटाळेच अधिक करीत आहेत. आता यावेळी वेगळाच तमाशा घडला आहे. एकदम हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. समजा तुम्ही १३ तास प्रवास करीत आहात आणि जेव्हा तुमचे विमान लँड होईल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही जिथून टेक ऑफ घेतलंय तिथंच विमान रिर्टन आलंय तर तुमची काय अवस्था होईल, तेव्हा तुम्ही केस उपटून घ्याल ना राव ! ‘याच साठी केला होता अट्टाहास’,अशी या प्रवाशांची अवस्था झाली !

वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण दुबईहून न्यूझीलंडला जाणाऱ्या एमिरेट्सच्या फ्लाईटचे आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 13 तासांहून अधिक काळ उड्डाण केल्यानंतर, एका विचित्र घटनेमुळे विमान पुन्हा जेथून उड्डाण केले होते त्या दुबईच्या विमानतळावर पोहचले. तेव्हा मधल्या तेरा तासांच्या प्रवासात विश्रांती घेणाऱ्या प्रवाशांना तर डोळे उघडल्यावर दुबईत पोहचल्याचे पाहून मोठा धक्का बसला.

फ्लाइट क्र. EK448 ने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता उड्डाण केले खरे. परंतू , पायलटने तब्बल 9,000 मैलांचा प्रवास केल्यानंतर अर्ध्या रस्त्यात यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतला. आणि अखेर शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री विमान दुबईत परतले. परंतू असे का झाले हे तर जाणून घ्या राव !

या दुबईच्या विमानाच्या वैमानिकाने यू-टर्न घेतला कारण न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे तेथील विमानतळ विकेण्डला बंद ठेवण्यात आले होते. ऑकलंड विमानतळाच्या अधिका-यांनी ट्विटरच्या पोस्ट केले आहे की , ‘ हे प्रवाशांसाठी अत्यंत निराशाजनक आहे’ आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत, परंतु प्रवाशांच्या संरक्षणासाठीच हे महत्त्वपूर्ण पावले उचलावे लागले.
ते पुढे म्हणाले, ‘ऑकलंड विमानतळ प्रशासन पुरामुळे आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहे आणि दुर्दैवाने आज कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकत नाहीत, हे निश्चित करण्यात आले आहे. आम्हाला माहित आहे की हे खूप निराशाजनक आहे, परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.