ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

| Updated on: Aug 15, 2019 | 3:10 PM

रजनीगंधा, पती पत्नी और वो यासारख्या चित्रपटांतून गाजलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं मुंबईत निधन झालं. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर अंधेरीतील रुग्णालयात उपचार सुरु होते.

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन
Follow us on

मुंबई : सत्तरच्या दशकात रजनीगंधा, पती पत्नी और वो यासारख्या चित्रपटातील गाजलेल्या दिग्गज अभिनेत्री विद्या सिन्हा (Vidya Sinha) यांचं निधन झालं. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

हृदयविकार, फुफ्फुसाच्या आजाराने विद्या सिन्हा काही वर्षांपासून त्रस्त होत्या. श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरु झाल्याने काही दिवसांपूर्वी जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सध्या व्हेंटिलेटरवर होत्या.

वयाच्या 18 व्या वर्षी विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. बासू चॅटर्जी यांनी रजनीगंधा (1974) या चित्रपटातून विद्या सिन्हा यांना ब्रेक दिला. या सिनेमाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर छोटी सी बात, पती पत्नी और वो, स्वयंवर यासारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. अभिनेता सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली होती.

विद्या सिन्हा यांनी टीव्ही मालिकांमधून सेकंड इनिंगला सुरुवात केली होती. काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी यासोबत नुकत्याच कुल्फी कुमार बाजेवाला या हिंदी मालिकेत त्या अखेरच्या दिसल्या.

विद्या सिन्हा यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. व्यंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत 1968 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. 1996 मध्ये अय्यर यांच्या निधनानंतर दत्तक कन्या जान्हवीसोबत त्या सिडनीमध्ये स्थायिक झाल्या.

2001 मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉ. नेताजी भीमराव साळुंखे यांच्यासोबत विद्या यांनी दुसरा विवाह केला. 2009 मध्ये साळुंखेंविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल केल्याने त्या अचानक चर्चेत आल्या. त्यानंतर 2011 मध्ये दुसऱ्या नवऱ्यालाही त्यांनी सोडचिठ्ठी दिली.