
औरंगाबाद : नाशिक परिसरातील धरणांमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे तुफान पूर आलाय. जवळपास 60 हजार क्यूसेक्सने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी ही बेफाम वाहते आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यात हे पुराचे पाणी दाखल झालं आहे. नदीकाठावर असलेली जुनी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर या परिसरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय.
एकीकडे गोदावरीला पूर आलेला असताना नांदूर मध्यमेश्वरमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
गंगापूर धरण समूहात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरलाय. त्यामुळे गंगापूर धरण जवळपास 86 टक्के भरलं आहे. परिणामी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणातून पाणी सोडलं जात असल्याने गोदाघाट आणि रामकुंड परिसरात अनेक मंदिरं पाण्याखाली गेले आहेत.
नाशिकचं पाणीसंकट मिटलं
गंगापूर धरण भरल्याने नाशिकचं पुढच्या वर्षभराचं पाण्याचं संकट मिटल्याने नाशिककर चांगलेच सुखावले आहेत. याशिवाय ओव्हरफ्लो झालेलं पाणी जायकवाडील पोहोचणार असल्याने मराठवाड्यालाही या पावसाचा काही प्रमाणात फायदा होणार आहे.
नाशिककर एकीकडे या पावसाचा आनंद घेत असताना दुसरीकडे गोदाघाटावर आलेल्या पर्यटकांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. तिर्थ क्षेत्र असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी मंदिरं पाहण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी येत असतात. मात्र पुरामुळे अनेकांना परतावं लागलं आहे.