मनसेचे उमेदवार अर्ज कधी भरणार? बड्या नेत्याने थेट तारीखच सांगितली
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी 30 डिसेंबरपर्यंत आहे. अशातच मनसेचे उमेदवार अर्ज कधी भरणार, याविषयी एका बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत शिल्लक असतानाही अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीत मुंबईसह बहुतेक महापालिकांमध्ये सहमती घडू शकलेली नाही. मुंबई, ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत आहे. यावर आता मनसेच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “जवळपास आमच्या बैठका आणि चर्चा झालेल्या आहेत. जागेचा तिढा सोडवण्याचा आणि उमेदवार निवडण्याचा.. अशा दोन्ही प्रक्रिया संपलेल्या आहेत. उद्या आमचे सर्व उमेदवार एकाच वेळेत फॉर्म भरतील. तर काही उमेदवार परवा भरतील. जागांवर चर्चा सुरू आहे, त्या ठिकाणी परवा फॉर्म भरले जातील,” असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “येत्या 15 दिवसांत आम्ही प्रचाराची रणनिती ठरवू. ठाण्याची जी काही बर्बादी केली आहे या लोकांनी, त्यावरून आम्ही ठाणेकरांचे प्रश्न मांडू. यावेळी ठाणेकर हे ठाकरे ब्रँडच्या पाठीशी उभे राहणार आहेत. ठाण्यामध्ये पाण्याचा प्रश्न, टँकर माफिया, वाहतूक कोंडी, रस्ते असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर कोणीच काही बोलत नाही. फक्त निवडणुकीत आम्ही काय केलं, आम्ही किती निधी खर्च केला, एवढंच बोललं जात आहे. जर असंच सुरू राहीलं तर पुढे ठाणे बर्बाद होईल.”
यावेळी ‘नमो भारत नमो ठाणे’ या भाजपच्या बॅनरविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ठाण्याने आता विचार करण्याची वेळ आली आहे. आज ‘नमो ठाणे नमो भारत’ असे बॅनर लागलेले आहेत. आवश्यक आहे त्याच्यावर बोला. महत्त्वाच्या प्रश्नांवर बोला आणि ‘नमो भारत नमो ठाणे’ ही जाहिरातबाजी बंद करा. ‘नमो भारत नमो ठाणे’ लिहून ठाण्याचा विकास होणार का? केंद्रातून हे निधी आणून ठाण्याचा विकास करणार, अशा प्रकारचे बॅनर लावा. तुम्ही कसले नमो भारत कसले नमो ठाणे? ठाणेकर यांना यावेळी त्यांची जागा दाखवणार आहेत. हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, आम्ही तुम्हाला दाखवतो. काल रात्री काँग्रेससोबत महाविकास आघाडीची आमच्यासोबत बैठक झाली. लवकरात लवकर जागेचा प्रश्न सुटेल. ईव्हीएमबाबत आम्ही बोलण्यात अर्थ नाही. मात्र बोगस दुबार मतदार आला तर त्याचे हात-पाय सुरक्षित इथून जाणार का नाही याच्यावर आमचा डाऊट आहे”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
घराणेशाहीबाबत अविनाश जाधव म्हणाले, “या लोकांनी गडगंज पैसे कमावले. एका घरात चार-चार, पाच-पाच जागा घ्यायच्या आणि सर्वांना गृहीत धरायचं. तिथल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? तुम्ही तुमच्या सोयीनुसार युती-आघाडी करायची. तिकडच्या कार्यकर्त्याने पाच वर्षे काम केलं, घरात जाऊन झेंडे उचलले, याबाबत संबंधित पक्षाने विचार केला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरात पाहिलं तर बरं होईल.”
