तुमचा बबड्या स्वतःहून शाळेसाठी उठून तयार होईल, फक्त टाईमटेबलमध्ये करा ‘या’ गोष्टी ॲड

Parenting Tips : अनेक वेळा लहान मुलं सकाळी शाळेसाठी उठायला टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेक पालक नाईलाजाने त्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतात. पण हे काही छोटेसे बदल त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत केल्यास ही समस्या सहज सोडवता येते.

तुमचा बबड्या स्वतःहून शाळेसाठी उठून तयार होईल, फक्त टाईमटेबलमध्ये करा या गोष्टी ॲड
मुलं सकाळी त्रास नाही देणार
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 4:33 PM

अनेक पालकांची तक्रार असते की लहान मुलं सकाळी उठून शाळेत जायला तयार होत नाहीत. रडणं, चिडचिड करणे किंवा हट्टीपणा हे अनेक कुटुंबांमध्ये रोजचं चित्र बनलेलं असतं. अशा वेळी मुलांना शाळेत पाठवणं एक मोठं आव्हान ठरतं. पण ही परिस्थिती अगदी सहजपणे हाताळता येऊ शकते. या आर्टीकलमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच काही टिप्स आणि सवयी, ज्या अंगीकारल्यास तुमचं मूल सकाळी स्वतःहून उठून हसतमुखानं शाळेसाठी तयार होईल!

घरात सकाळचं वातावरण असावं सकारात्मक

पालक अंजली यादव सांगतात की, सकाळचा पहिला अनुभव मुलांसाठी आनंददायक असावा. त्यांना उठल्यावर थोडीशी मॉर्निंग वॉकसाठी घेऊन जा. ताजं हवामान आणि थोडीशी हालचाल यामुळे त्यांचा मूड सुधारतो. याचबरोबर, रात्रीची झोप पुरेशी झाली पाहिजे, म्हणजे सकाळी उठणं सहज होतं. जर मुलं उठताना चिडचिड करत असतील तर त्यांना प्रेमानं समजावावं, रागावणं किंवा मार देणं टाळावं.

मुलांची इतरांशी तुलना करु नका

काही पालक त्यांच्या मुलांची तुलना शेजारच्या किंवा क्लासमधील इतर मुलांशी करतात, जे मुलांच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम करतं. त्यामुळे हे टाळा आणि त्याऐवजी त्यांना शाळेत जाण्याबद्दल प्रेरणा द्या. उदाहरणार्थ, त्यांना आवडतं डब्यातील जेवण द्या किंवा शाळेनंतर त्यांच्या आवडीचं काही बनवा. यामुळे त्यांना शाळेत जाण्याची उत्सुकता निर्माण होते.

संध्याकाळचं वातावरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं

अनेकदा असं दिसून येतं की, मुलं आपलं होमवर्क पूर्ण न करता झोपतात आणि त्याचं दडपण दुसऱ्या दिवशी सकाळी जाणवतं. म्हणून संध्याकाळी घरात शांत, आनंददायक वातावरण असावं. संध्याकाळी गार्डनमध्ये थोडा वेळ घालवला तर त्यांचा मूड चांगला राहतो आणि ते मन लावून अभ्यास करतात. पालक आणि शिक्षकांनीही मुलांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवलं पाहिजे.

मोबाइलचा योग्य वापर करा

सध्याच्या काळात मुलं रडायला लागली की पालक त्यांना लगेच मोबाइल देतात. पण ही सवय त्यांच्या मन:स्वास्थ्यासाठी घातक आहे. त्याऐवजी मोबाइलवर शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक कंटेंट दाखवा जसं की कविता, अक्षरांची ओळख, गोष्टी इत्यादी. खेळांमध्ये अडकलेली मुलं पुढे जाऊन हट्टी होऊ शकतात.

शेवटी काय

पालकांनी मुलांच्या दिनक्रमात काही साधे बदल केल्यास आणि त्यांच्याशी संवाद वाढविल्यास, मुलं आनंदानं आणि सहजपणे शाळेसाठी तयार होऊ शकतात. यासाठी रागावण्यापेक्षा प्रेम, संवाद आणि योग्य सवयी अंगीकारणं महत्त्वाचं आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)