
जर तुम्हीही दररोज मुलांची खोली साफ करून थकून गेला असाल आणि या कामात तुमचा बराच वेळ जात असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे! मुलांच्या खोलीमधील पसारा आणि त्यांची मस्ती अनेकदा पालकांसाठी डोकेदुखी ठरते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरून तुम्ही मुलांची खोली दररोज केवळ 5 मिनिटांत स्वच्छ करू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता.
खोली स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा:
1. अनावश्यक वस्तू दूर करा आणि खेळणी मर्यादित ठेवा:
खोली स्वच्छ करण्यापूर्वी, अशा वस्तू बाहेर काढा, ज्यांचा उपयोग कमी होतो किंवा ज्या अनावश्यक आहेत. या वस्तू वरच्या शेल्फवर किंवा बेड बॉक्समध्ये ठेवू शकता. यामुळे खोली कमी अस्ताव्यस्त दिसेल. तसेच, मुलांची सर्व खेळणी एकाच वेळी खोलीत ठेवण्याऐवजी, त्यांची दोन भागांत विभागणी करा. अर्धी खेळणी ठेवून अर्धी बाजूला ठेवा. यामुळे एकाच वेळी खोलीत कमी पसारा होईल आणि स्वच्छता करणे सोपे होईल.
2. मुलांना स्वयंपाकघरातच जेवण द्या:
जर तुम्ही मुलांना खाण्यासाठी काही देत असाल, तर त्यांना फक्त स्वयंपाकघरातच खाण्याची परवानगी द्या. मुलांनी त्यांच्या खोलीत खाल्ले तर खोली अस्वच्छ होण्याची शक्यता जास्त असते. खाण्याचे कण किंवा सांडलेले पदार्थ खोलीत पसारा वाढवतात, ज्यामुळे स्वच्छता करणे अधिक कठीण होते. ही सवय लावून घेतल्यास खोली बऱ्याच अंशी स्वच्छ राहील.
3. मुलांच्या मदतीने करा खोली स्वच्छ:
खोली साफ करताना तुम्ही मुलांनाही सोबत घेऊ शकता. जर तुमचे कुटुंब आणि मुले एकत्र खोली साफ करतील, तर कमी वेळात खोली सहजपणे स्वच्छ होईल. यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मुलांनाही स्वच्छतेची सवय लागेल. त्यांना कामात सामील करून घेतल्याने त्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि ते स्वतःहून पसारा कमी करण्याचा प्रयत्न करतात.
4. ‘टॉय बास्केट’ किंवा लहान कपाट वापरा:
बाजारतून ‘टॉय बास्केट’ (खेळणी ठेवण्याची टोपली) किंवा लहान कपाटे आणू शकता. यामुळे मुलांनी इकडे-तिकडे टाकलेला पसारा किंवा खेळणी त्वरित ‘टॉय बास्केट’मध्ये किंवा कपाटात ठेवता येतात. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि खोली त्वरित नीटनेटकी दिसेल.
5. काचेच्या वस्तू दूर ठेवा आणि मर्यादित सामान ठेवा:
मुलांच्या खोलीत काचेच्या वस्तू ठेवणे टाळा, कारण त्या फुटण्याचा धोका असतो. त्याऐवजी, अशा वस्तू ठेवा ज्यामुळे त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मुलांच्या खोलीत नेहमी मर्यादित सामान ठेवा. जास्त सामान असल्यास, जास्त पसारा होतो आणि स्वच्छता करणे अधिक कठीण होते.