
आपल्या घराचा रंग हा केवळ भिंतींची सजावट किंवा पाहुण्यांवर प्रभाव पाडण्याचे साधन नसून, तो आपल्या मानसिक आरोग्याचा आरसा असतो. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, प्रत्येक रंगाच्या लहरी आपल्या मेंदूतील हार्मोन्सवर थेट परिणाम करतात. त्यामुळे जर तुमच्या घरातील रंगांची निवड योग्य असेल तर घरातील वातावरण केवळ प्रसन्नच राहत नाही, तर ते शारीरिक स्वास्थ्यासाठीही पूरक ठरते. तुमच्या घरातील कोणत्या खोलीचा रंग तुमच्या आयुष्यात आणि आरोग्यात नेमके काय बदल घडवून आणू शकतो, हे आज आपण जाणून घेऊया.
१. बेडरूम: निळा आणि जांभळा
बेडरूममध्ये आपण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी येतो. त्यामुळे तिथे निळा रंग असावा. कारण हा शरीरातील स्ट्रेस हार्मोन (Cortisol) कमी करतो. जर एखाद्याला निद्रानाशाचा त्रास असेल, तर फिकट निळ्या भिंती त्याला लवकर झोप लागायला मदत करतात. तसेच जांभळा रंग हा सर्जनशीलता आणि ध्यानधारणेसाठी उत्तम आहे. यामुळे मनातील विस्कळीत विचार शांत होतात.
२. किचन आणि डायनिंग : पिवळा आणि केशरी
स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे घराची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी पिवळा रंग लावावा. पिवळ्या रंगाकडे पाहिल्यावर मेंदूत सेरोटोनिन नावाचे आनंदी हार्मोन तयार होते. यामुळे सकाळी उठल्यावर किचनमध्ये गेल्यावर लगेच फ्रेश वाटते.
केशरी : हा रंग भूक वाढवण्यासाठी ओळखला जातो. ज्या मुलांना जेवणाची आवड कमी आहे, त्यांच्या डायनिंग रूममध्ये केशरी रंगाचा छोटासा भाग असल्यास सकारात्मक बदल दिसू शकतो.
३. हॉल किंवा लिव्हिंग रूम: बेज आणि उबदार पांढरा
हॉल किंवा लिव्हिंग रुम हे तुमच्या घराचे फर्स्ट इम्प्रेशन असते. या ठिकाणी अनेक पाहुणे येतात, तसेच घरातील लोक गप्पा मारतात. या ठिकाणी तुम्ही बेज किंवा ऑफ-व्हाईट (Beige/Off-white) हे रंग लावू शकता. यामुळे नात्यांमध्ये विश्वास आणि जवळीक निर्माण करतात. हे रंग डोळ्यांना टोचत नाहीत, त्यामुळे इथे बसल्यावर माणसे जास्त वेळ मोकळेपणाने संवाद साधू शकतात.
४. मुलांची अभ्यासाची खोली: हिरवा
निसर्गात वावरताना आपल्याला जसा ताजेपणा जाणवतो, तसाच परिणाम हिरव्या रंगाचा होतो. अभ्यासाच्या खोलीत हिरवा रंग असल्यास मेंदू लवकर थकत नाही आणि वाचन केलेली माहिती जास्त वेळ लक्षात राहते.
भिंतींचा रंग कोणताही असला तरी छत (Ceiling) पांढरे असावे. यामुळे खोली हवेशीर वाटते. तसेच मनात बंदिस्त जागेची भीती निर्माण होत नाही. रंगाचा परिणाम प्रकाशावरही अवलंबून असतो. पिवळ्या प्रकाशात गडद रंग जास्त उठावदार दिसतात, तर पांढऱ्या प्रकाशात फिकट रंग डोळ्यांना शांतता देतात. पण चुकूनही गडद लाल किंवा गडद काळा रंग संपूर्ण खोलीला देऊ नका. यामुळे मनात भीती किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते.