उन्हाळ्यात स्किनकेअर करताना तुम्ही सुद्धा ‘या’ 5 सामान्य चुका करताय? जाणून घ्या

तुम्हालाही जर या उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी, स्वच्छ आणि चमकदार राहावी असे वाटत असेल, तर स्किनकेअर करताना नकळतपणे होणाऱ्या या 5 चुका बद्दल जाणून घेऊयात. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही.

उन्हाळ्यात स्किनकेअर करताना तुम्ही सुद्धा या 5 सामान्य चुका करताय? जाणून घ्या
Skincare
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 7:26 PM

उन्हाचे चटके लागायला सुरूवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच, त्याशिवाय तीव्र सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम त्वचेवर होतो आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या ऋतूत योग्य त्वचेची काळजी घेतली नाही तर टॅनिंग, पिंपल्स, सनबर्न, रॅशेस आणि कोरडेपणा यासारख्या समस्या सामान्य होतात. या ऋतूत बरेच लोकं महागडे स्किनकेअर उत्पादने वापरतात, पण स्किन केअर करताना मात्र नकळतपणे काही लहान-सहान चुका होतात ज्याचा त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते.

खरं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक संरक्षण आणि ओलावा असणे आवश्यक असते, कारण तीव्र सूर्यप्रकाश त्वचेच्या वरच्या थराला नुकसान पोहोचवू शकतो. शिवाय जास्त घामामुळे त्वचेचे छिद्र बंद होते, ज्यामुळे मुरुमे आणि जळजळ होऊ शकते. बऱ्याचदा उन्हाळ्यात स्किनकेअर करताना नकळतपणे झालेल्या या चुका त्वचेवर परिणाम करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या चुकांबद्दल जाणून घेऊयात.

सनस्क्रीन न लावणे

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना केली जाणारी पहिली चूक म्हणजे सनस्क्रीन न लावणे. तीव्र सूर्यप्रकाशाची अतिनील किरणं त्वचेसाठी सर्वात जास्त हानिकारक असतात. बरेच लोकं बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावत नाही, जी एक मोठी चूक आहे. सनस्क्रीन न लावल्याने टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून कडक उन्हाळ्यात बाहेर जाण्यापुर्वी 20 मिनिटे आधी एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावणे आणि गरज पडल्यास पुन्हा लावणे महत्वाचे आहे.

पुरेसे पाणी न पिणे

उन्हाळ्यात शरीर घामाच्या स्वरूपात भरपूर पाणी गमावते. जर तुम्ही या दिवसांमध्ये पुरेसे पाणी प्यायले नाही तर तुमची त्वचा डिहाइड्रेट होऊ शकते. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी, नारळ पाणी आणि रसाळ फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

चेहरा वारंवार धुणे

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात घाम येतो. त्यामुळे बरेच लोक वारंवार फेसवॉशने चेहरा धुवत असतात. मात्र ही सवय त्वचेसाठी हानिकारक देखील असू शकते. वारंवार चेहरा धुण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे कोरडेपणा आणि संवेदनशीलता येऊ शकते. दिवसातून फक्त 2 ते 3 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे चांगले.

ऑयली क्रीमचा वापर

काही लोकं हिवाळ्यातील वापरत असलेली ऑयली क्रीमचा उन्हाळ्यातही वापरत करतात. पण उन्हाळ्यात या क्रीमच्या वापरामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होऊ शकतात आणि मुरुमे किंवा तेलकट त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या ऋतूत हलके, वॉटर बेस्ड आणि ऑयली नसलेले मॉइश्चरायझर वापरणे चांगले.

खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा

उन्हाळ्यात जास्त तळलेले आणि जंक फूड खाल्ल्याने तुमच्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात, ज्यामुळे मुरुमे आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. निरोगी त्वचा राखण्यासाठी, तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, सॅलड आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us