तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाता? वेळीच व्हा सावध, संशोधनातून समोर आली भयंकर गोष्ट

आजकालच्या डिजिटल लाइफस्टाइलमध्ये टॉयलेट हे केवळ शरीराच्या स्वच्छतेचं ठिकाण न राहाता, “स्क्रॉलिंग झोन” देखील बनलं आहे.अनेक लोकांना टॉयलेटमध्ये आपला मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते.

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाता? वेळीच व्हा सावध, संशोधनातून समोर आली भयंकर गोष्ट
| Updated on: Apr 20, 2025 | 8:30 PM

आजकालच्या डिजिटल लाइफस्टाइलमध्ये टॉयलेट हे केवळ शरीराच्या स्वच्छतेचं ठिकाण न राहाता, “स्क्रॉलिंग झोन” देखील बनलं आहे.अनेक लोकांना टॉयलेटमध्ये आपला मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते, त्यामुळे होतं काय लोक टॉयलेटवर 20-25 मिनिटांपर्यंत देखील बसून राहातात. ही सवय तुमच्यासाठी अत्यंत हानीकारक असून, या सवयीमुळे तुमचं इतकं नुकसान होऊ शकतं, ज्याचा तुम्ही कधी अंदाज देखील लावू शकणार नाहीत. याबाबत आता आरोग्य तज्ज्ञांकडून देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार तुम्हाला जर टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर तुम्हाला पाईल्स, बद्धकोष्ठता आणि किडनीशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन टॉयलेट सीटवर दीर्घकाळ बसून राहातात. तेव्हा तुमच्या गुदद्वाराच्या नसांवर दबाव पडतो. अशा स्थितीमध्ये आपण तिकडे दुर्लक्ष केलं आणि तसाच मोबाईल घेऊन बसलो तर हा दबाव आणखी वाढतो. यातून तुम्हाला बद्धकोष्ठतेसारखा आजार होऊ शकतो. काही लोक तर टॉयलेट सीटवर एवढावेळ बसून राहतात की त्यांना ती आरामदायक जागा वाटते. मात्र यामुळे तुमच्या पोटाच्या नैसर्गिक हालचाली प्रभावित होतात. त्यामुळे जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर वेळीच सावध व्हा असं डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काही लोकांना वीस ते पंचवीस मिनिटं टॉयलेट सीटवर बसण्याची सवय असते. मात्र त्यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे टॉयलेटमध्ये पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त बसू नका असा सल्ला डॉक्टर देतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये बदल करा, पाईल्सचा त्रास असेल तर जास्त मसालेयुक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये करू नका, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पिण्यास देखील सांगण्यात आलं आहे. टॉयलेटमध्ये मोबाईल नेण्याची सवय ही अत्यंत घातक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा सवयी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.