
घरातला पाळीव कुत्रा म्हणजे आनंदाचा आणि प्रेमाचा अविरत स्रोत. परंतु, काही वेळा त्यांच्या अंगाला येणारा विशिष्ट वास घरातील सदस्यांना आणि पाहुण्यांनाही त्रासदायक ठरतो. हा वास अनेक कारणांमुळे येऊ शकतो आणि त्यावर योग्य ती काळजी घेतल्यास सहज नियंत्रण मिळवता येते. या समस्येचे मूळ कारण आणि उपायांवर एक नजर टाकूया.
डॉगीच्या शरीरातील वास कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला वेळच्या वेळी आंघोळ घालणे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, माणसांसाठी असलेले शॅम्पू त्यांच्या संवेदनशील त्वचेसाठी योग्य नसतात. त्यामुळे कुत्र्यांसाठी खास तयार केलेले सौम्य आणि त्वचेला मानवणारे शॅम्पू वापरणे योग्य ठरते. विशेषतः ओटमील-आधारित शॅम्पू वापरल्यास त्वचेला आराम मिळतो आणि सूज अथवा जळजळ कमी होते.
आंघोळीनंतर कुत्र्याचे केस पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे. ओले केस राहिल्यास त्यात जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते आणि यामुळेच दुर्गंधी वाढते. शक्य असल्यास टॉवेलने पुसल्यानंतर मंद गरम हवेच्या ड्रायरचा वापर करावा.
डॉगीच्या दुर्गंधीवर घरगुती आणि नैसर्गिक उपायसुद्धा प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ, एक कप पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून ते मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरावे व डॉगीच्या अंगावर हलक्या हाताने फवारावे. यामुळे दुर्गंधी दूर होते आणि केसांना चकाकी येते.
तसेच खोबरेल तेलात कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहते आणि वास येण्याचा धोका कमी होतो. मात्र हे मिश्रण लावताना डॉगीच्या डोळ्यांत किंवा जखमांवर जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.
फक्त डॉगीच्या शरीराचीच नाही, तर त्याच्या बिछान्याची व घरातील जागांची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. डॉगी ज्या ठिकाणी जास्त वेळ घालवतो तेथे जंतू लवकर वाढू शकतात. त्यामुळे त्याची चादर, पांघरूण व बिछाना दर आठवड्याला धुणे आणि उन्हात वाळवणे आवश्यक आहे. यामुळे दुर्गंधी टाळली जाते आणि जंतूंचा नाश होतो.
डॉगीच्या आहाराचा थेट संबंध त्याच्या अंगाला येणाऱ्या वासाशी आहे. त्याला संतुलित, पोषणमूल्यांनी भरलेले आणि दर्जेदार अन्न द्यावे. आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडसारखे घटक असतील तर त्वचा व केस निरोगी राहतात आणि वास येण्याची शक्यता कमी होते.
जर हा वास दीर्घकाळ टिकून राहत असेल किंवा त्यासोबत त्वचेला खाज, जळजळ किंवा इतर त्रास होत असेल तर त्वरीत पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा अंतर्गत आजार, हार्मोनल बदल अथवा संसर्गामुळेही हा वास निर्माण होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)