Fitness Tips: थंडीत व्यायाम न करताही राहू शकता फिट, रोजच्या जीवनात फॉलो करा या सोप्या सवयी
Winter Fitness Tips: हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांना व्यायाम किंवा वर्कआउट करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी फिट राहण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही सोप्या सवयींचा समावेश करता येतो. जाणून घ्या कोणत्या सवयी आरोग्य आणि फिटनेस टिकवण्यास मदत करू शकतात.

फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र, हिवाळ्यात वाढलेल्या थंडीमुळे अनेकांना सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. तर काहींना कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वर्कआउटसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकजण फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नेहमीच जिममध्ये जाऊन किंवा तासन्तास वर्कआउट करण्याची गरज नसते. रोजच्या दिनचर्येत काही सोप्या सवयींचा समावेश करूनही शरीर सक्रिय ठेवता येऊ शकते. या सवयी केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठीही उपयुक्त ठरतात. चला तर जाणून घेऊया, हिवाळ्यात फिट राहण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात.
स्वतःला सक्रिय ठेवा
फिट राहण्यासाठी शरीराची हालचाल होणे महत्त्वाचे आहे. व्यायामासाठी वेळ मिळत नसेल किंवा थंडीमुळे बाहेर जाणे शक्य नसेल, तर स्वतःला घरातच सक्रिय ठेवा. यासाठी घरातील छोटी-मोठी कामे करू शकता किंवा काही वेळ घरातच चालू शकता. तुम्हाला डान्स करण्याची आवड असेल तर आवडीची गाणी लावून थोडा वेळ डान्सही करू शकता. यामुळे शरीराची हालचाल होण्यासोबतच मूडही चांगला राहतो.
पुरेशी झोप घ्या
दिवसभर उत्साही आणि सक्रिय राहण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप आवश्यक आहे. शरीराला दिवसभराच्या थकव्यातून सावरण्यासाठी विश्रांतीची गरज असते. त्यामुळे दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. अपुऱ्या झोपेमुळे थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा.
पौष्टिक आहार घ्या
फिटनेस टिकवण्यासाठी शारीरिक हालचालींसोबत आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतील याची काळजी घ्या. आहारात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यासाठी हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि सुका मेवा खाऊ शकता. संतुलित आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच एकंदर आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
आवडीचे संगीत ऐका
शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. यासाठी आवडीचे संगीत ऐकणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. संगीत ऐकल्यामुळे मूड सुधारण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते. घरातील कामे करताना किंवा मोकळ्या वेळेत आवडीची गाणी ऐका. यामुळे मन प्रसन्न राहते आणि दिवसभर उत्साही वाटू शकते.