Gardening Tips : गुलाबाला भरभरून फुलं हवीत? ‘या’ महिन्यात लावा रोप, उपयोगी पडतील या सोप्या टिप्स
Gardening Tips : गुलाबाचं रोप लावूनही फुलं येत नाहीत? रोपाची योग्य वेळी लागवड आणि नियमित निगा राखल्यास ही समस्या कमी होऊ शकते. गुलाबाला भरपूर फुलं यावीत यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

घराची बाल्कनी, गच्ची किंवा बागेची शोभा वाढवणाऱ्या आवडत्या फुलांपैकी एक म्हणजे गुलाब. रंगीबेरंगी गुलाब फुलले की संपूर्ण परिसराचे सौंदर्यच खुलून दिसते. त्यामुळे अनेकांना आपल्या बागेत किंवा बाल्कनीत गुलाबाची रोपं लावण्याची आवड असते. मात्र, गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी आणि भरपूर फुलं येण्यासाठी केवळ रोप लावून चालत नाही.
लागवडीची योग्य वेळ, सूर्यप्रकाश, पाण्याचे प्रमाण, माती आणि खत यांचीही तितकीच काळजी घ्यावी लागते. यातील एखादी गोष्ट चुकली तरी रोपाची वाढ खुंटू शकते किंवा फुलांचा बहर कमी होऊ शकतो. त्यामुळे गुलाबाची लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि भरपूर फुलांसाठी कोणत्या टिप्स उपयोगी ठरतील, जाणून घेऊया.
गुलाबाचे रोप कोणत्या महिन्यात लावावे?
गुलाबाचे रोप लावण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी योग्य मानला जातो. विशेषतः उत्तर भारतासारख्या हवामानात हा काळ गुलाबाच्या लागवडीसाठी अनुकूल असतो. फेब्रुवारीमध्येही नवीन रोप लावता येते. मात्र, मे-जूनमधील तीव्र उष्णतेत नवीन गुलाबाचे रोप लावणे टाळावे. योग्य काळात लागवड केल्यास रोपाची वाढ चांगली होण्यास आणि वेळोवेळी फुले येण्यास मदत होऊ शकते.
रोज देऊ नका पाणी
गुलाबाच्या रोपाला दररोज ठराविक वेळी पाणी देण्याची गरज नाही. पाणी देण्यापूर्वी कुंडीतील मातीची ओल तपासावी. माती कोरडी वाटत असल्यासच पाणी द्यावे. तसेच आठवड्यातून एकदा रोपाची पाने आणि नवीन कळ्या तपासणेही महत्त्वाचे आहे. गुलाबाच्या रोपाला किड लवकर लागू शकतात, त्यामुळे त्यावर नियमित लक्ष ठेवावे.
फुले येत नसतील तर करा ‘या’ गोष्टी
गुलाबाच्या रोपाला दररोज किमान ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास रोपाची वाढ आणि फुलोरा प्रभावित होऊ शकतो. तसेच जास्त किंवा कमी पाणी देणेही रोपासाठी योग्य नाही. कुंडीतील वरची १ ते २ इंच माती कोरडी झाल्यानंतर रोपाला व्यवस्थित पाणी द्यावे. दररोज थोडे-थोडे पाणी देण्याची गरज नसते.
खत देण्यासोबत छाटणीही करा
गुलाबाच्या रोपाला साधारण २० ते ३० दिवसांनी चांगले शेणखत देता येते. फुलांच्या हंगामात संतुलित खताचाही वापर करता येतो. यासोबतच रोपाची छाटणी करणेही महत्त्वाचे आहे. सुकलेल्या, कमकुवत आणि आतल्या बाजूने वाढणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. तसेच जुनी फुले वेळोवेळी काढत राहिल्यास रोपाला नवीन कळ्या तयार करण्यासाठी ऊर्जा वापरण्यास मदत होते.
गुलाबासाठी माती कशी तयार करावी?
गुलाबाच्या रोपासाठी पाणी साचून न राहता त्याचा योग्य निचरा होईल, अशी माती आवश्यक आहे. यासाठी ४० टक्के सामान्य माती, ३० टक्के कंपोस्ट किंवा कुजलेले शेणखत आणि ३० टक्के वाळू व कोकोपीट यांचे मिश्रण करता येते. या मिश्रणामुळे माती सुपीक राहण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.