बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही…

बकरीचे दूध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात विविध औषधी गुणधर्म आहेत. पचन सुधारणे, हाडे मजबूत करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ते फायदेशीर आहे. सूज व वेदना कमी करते आणि रक्ताची कमतरता दूर करते. गरम किंवा थंड प्यावे, पण आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही...
Goat Milk
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 11, 2025 | 3:00 PM

गायी, म्हशीचे दूध पिणे सामान्य गोष्ट आहे. पण अनेकजण बकरीचे दूधही पितात. याशिवाय ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बकरीचे दूध विविध औषधी गुणांनी समृद्ध असते. पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये याचा वापर केला जातो. आयुर्वेदातही बकरीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. डॉक्टरदेखील अनेक आजारांमध्ये बकरीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र काहींना याचा वास आवडत नाही, त्यामुळे ते प्यायचे टाळतात.

पण प्रश्न असा निर्माण होतो की, बकरीचे दूध कुणासाठी चांगले आहे? ते नेमके कसे काम करते? त्यावरच टाकलेला हा प्रकाश…

कोणत्या आजारांमध्ये फायदेशीर

1. पचनसंस्थेच्या समस्या:

बकरीच्या दुधातील सूक्ष्म चरबीचे कण आणि A2 कॅसिन प्रथिन पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे गॅस, अपचन, आम्लपित्त इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

2. हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे:

बकरीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. संधिवात, सांध्यांचा त्रास आणि अकड कमी होऊन लवचिकता वाढते. तसेच सेलेनियम आणि झिंक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

3. डेंग्यूचा आजार:

डेंग्यू झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. अशा वेळी बकरीचे दूध पिल्यास प्लेटलेट्सची संख्या वाढते, असे मानले जाते. ते पूर्ण बरे करत नसले तरी रुग्णाच्या आरोग्य सुधारण्यास मदत करते.

4. सूज आणि वेदना कमी करणे:

बकरीच्या दुधात दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म आहेत. त्यामुळे स्नायू आणि ऊतींमधील सूज कमी होते आणि वेदना कमी होतात.

5. रक्तातील कमतरता भरून काढणे:

जर शरीरात लोह (आयरन) कमी असेल तर बोकडाचे दूध फायदेशीर ठरते. हे रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि रक्ताल्पता दूर करते.

कसे प्यावे

तज्ज्ञांच्या मते, बकरीचे दूध गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे पिणे शक्य आहे. हिवाळ्यात थोडे गरम करून प्यावे, यामुळे पचन सुधारते आणि झोप चांगली लागते. उन्हाळ्यात दूध उकळून थंड करून प्यावे.

लक्षात ठेवा

बकरीचे दूध हाडे, दात, मेंदू, स्नायू, रोगप्रतिकारक शक्ती, रक्त आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रौढ व्यक्ती दररोज सुमारे 200-250 मिलीलीटर दूध घेऊ शकतात. मात्र जर तुम्हाला एखादा आजार असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.