Dal Pakwan: सोप्या पद्धतीने घरी बनवा टेस्टी दाल पकवान, सर्वांना आवडेल ही सिंधी डिश
सिंधी खाद्यसंस्कृतीतील दाल पकवान हा एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. कुरकुरीत पकवान आणि मसालेदार डाळीचा हा बेत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या, दाल पकवान घरी बनवण्याची सोपी रेसिपी.

सकाळच्या नाश्त्यासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट करून पाहा. सिंधी स्टाइल दाल पकवान हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कुरकुरीत पकवान आणि मसालेदार डाळ यांचा सुरेख मेळ असलेला हा पदार्थ सिंधी कुटुंबांमध्ये आवडीने बनवला जातो. मात्र, आता केवळ सिंधी लोकांमध्येच नाही, तर इतर लोकांमध्ये सुद्धा या पदार्थाची लोकप्रियता वाढली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्याची चव आवडते. विशेष म्हणजे, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही हा पदार्थ सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, चविष्ट सिंधी दाल पकवान बनवण्याची सोपी रेसिपी.
दाल पकवान बनवण्यासाठी साहित्य
– हरभरा डाळ एक वाटी
– बारीक चिरलेला टोमॅटो
– १ कांदा बारीक चिरलेले
– लाल तिखट
– धने पावडर एक चमचा
– गरम मसाला एक चमचा
– हळद
– चाट मसाला
– मोहरी
– जिरे
– लिंबू
– चिंच
– पाणी
– तेल
– मीठ
पकवान बनवण्यासाठी
– २ कप मैदा
– १ चमचा ओवा
– अर्धा चमचा तेल
– कोमट पाणी
– मीठ
दाल पकवान बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम दाल बनवण्यासाठी हरभरा डाळ धुवून अर्धा तास भिजत घाला. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी, हळद आणि मीठ एकत्र करून डाळ शिजवा. कुकरमध्ये ५-६ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडून घ्या. नंतर टोमॅटो घालून शिजवा. टोमॅटो शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि धनेपूड टाका. एक मिनिट परतून झाल्यावर त्यात शिजलेली हरभरा डाळ घाला. चांगले मिसळा आणि दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. तुमची दाल तयार आहे.
आता पकवान बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. त्यात मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घाला. सर्व साहित्य मैद्यामध्ये मिसळा आणि घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर हे पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून लाटून घ्या. या पुरीवर काट्याच्या साहाय्याने होल करा. जेणेकरून ते तळताना फुगणार नाहीत. कढईत तेल गरम करा. या पुर्या गरम तेलात टाकून तळून घ्या. ते पूर्णपणे कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून प्लेटमध्ये काढा. आता यावर दाल टाका आणि चाट मसाला, कांदा, लिंबू घालून गरम गरम सर्व्ह करा.