पावसाळ्यात एसीचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा कराल?
"पावसात एसी लावू नये" हा केवळ एक गैरसमज आहे. वास्तव पाहता, पावसाळ्यातील दमटपणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी एसीचा वापर योग्य प्रकारे करणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः एसीमधील 'या' खास मोडचा वापर केल्यास न केवळ घरातील वातावरण आरोग्यदायी राहतं, तर विजेची बचतही होते.

पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा जाणवतो, मात्र त्याच वेळी आर्द्रताही खूप वाढते. बाहेर हवा थोडीशी गारसर असली, तरी घरात दमटपणा, चिकटपणा, घामटपणा आणि बुरशीसारख्या समस्या वाढू लागतात. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की पावसात एसी चालवावा की नाही? 90% लोकांना वाटतं की पावसाळ्यात वातावरण गार असल्याने एसी चालवण्याची गरज नसते. पण खर म्हणजे पावसाळ्यातही एसीचा वापर करावा पण का ? ते जाणून घेऊ.
पावसात एसी वापरणं का गरजेचं आहे?
पावसाळ्यात हवामानात तापमान फारसं जास्त नसतं, पण आर्द्रता (Humidity) मात्र कमालीची असते. हवेतील जास्त ओलावा घरात दमटपणा निर्माण करतो, फर्निचरला गंध येतो, कपड्यांवर बुरशी येते, आणि आरोग्यावरही परिणाम होतो. याच क्षणी एसीचा योग्य वापर खूप फायदेशीर ठरतो.
एसीचा “Cool Mode” जरी तापमान कमी करत असला, तरी पावसाळ्यात तो फारसा उपयुक्त नसतो. याऐवजी एसीमधील “Dry Mode” हा मोड सर्वात प्रभावी मानला जातो. Dry Mode हवेमधील आर्द्रता कमी करून खोली अधिक कोरडी आणि आरामदायक बनवतो. त्यामुळे कोणतीही थंडी निर्माण न होता फक्त दमटपणातून सुटका मिळते.
पावसात ‘Dry Mode’ का आहे उपयुक्त?
एसीमध्ये विविध मोड्स असतात त्यातलाच एक म्हणजे Dry Mode. हा मोड विशेषतः आर्द्रतेच्या दिवसांसाठी डिझाइन केला गेलेला असतो. पावसाळ्यात जेव्हा तापमान फारसं उष्ण नसतं, पण दमटपणा खूप असतो, तेव्हा Dry Mode अत्यंत उपयुक्त ठरतो.
Dry Mode एसीमध्ये असलेला एक पर्याय आहे जो हवेतील ओलावा (moisture) कमी करतो. तो खोली थंड करण्यापेक्षा कोरडी ठेवण्यावर भर देतो. यामुळे घरातील दमट वास, चिकटपणा आणि बुरशी यावर नियंत्रण मिळवता येतं. त्याचबरोबर विजेची बचतही होते, कारण या मोडमध्ये कंप्रेसर सतत चालू राहत नाही.
Dry Mode वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
- 1. Dry Mode चा वापर दररोज 2-3 तास पुरेसा ठरतो.
- 2. खिडक्या बंद ठेवा, जेणेकरून बाहेरील आर्द्र हवा आत येणार नाही.
- 3. तापमान 24-26 अंशांवर ठेवणं आरोग्यदृष्ट्या सुरक्षित मानलं जातं.
- 4. जर खोलीत बाळं, वृद्ध किंवा दमा असलेली व्यक्ती असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.