
आपल्या भारतीय जेवणात भाजी असो वा चटणी कोथिंबीर वरून पेरल्याशिवाय किंवा त्यामध्ये टाकल्याशिवाय चव येतच नाही. त्यात अनेकांना त्यांच्या जेवणात कोथिंबीर वरून पेरलेली लागतेच. पण अनेकदा महिला बाजारातुन कोथिंबीरची जुडी खरेदी करतात, पण एक-दोन दिवसातच कोथिंबीरची पाने पिवळी आणि सुकून जातात. या समस्येमुळे अनेकदा कोथिंबीर वाया जाते आणि तिचा वास टिकत नाही. जर तुमच्याही घरात अशी अडचण असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा काही सोप्या उपायांच्या मदतीने कोथिंबीर अधिक दिवस ताजी आणि फ्रेश ठेवता येते. चला तर मग आजच्या लेखात आपण या उपयुक्त ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.
तुम्हाला जर कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवायची असेल, तर कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. आता कोथिंबीर कापडावर किंवा टिश्यूवर पसरवा आणि पूर्णपणे वाळू द्या. लक्षात ठेवा, ओलावा हे पाने खराब होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून, कोथिंबीर पूर्णपणे कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.कोथिंबीर ताजी ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी तुम्ही ती हवाबंद डब्यात टिश्यूने झाकून ठेवू शकता. हे करण्यासाठी एक हवाबंद डबा घ्या आणि तळाशी टिश्यू पेपर ठेवा. त्यावर कोथिंबीर पसरवा आणि वर दुसरा टिश्यू ठेवा आणि डब्याचे झाकण बंद करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. टिश्यू जास्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे कोथिंबीर बराच दिवस ताजी राहते.
तुम्ही कोथिंबीर पाण्याच्या भांड्यातही ठेवू शकता. एक ग्लास किंवा बाटली घ्या आणि त्यात थोडे पाणी भरा. आता, कोथिंबीर देठांसह पाण्यात ठेवा. त्यांना पॉलिथिनने किंवा झाकणाने हलके झाकून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. या पद्धतीने कोथिंबीर 5-6 दिवस ताजी राहते.
तुम्ही जर कोथिंबीर त्याच्या मुळांसह खरेदी केली तर ती जास्त दिवस ताजी राहते. तुम्हाला फक्त त्याची चांगली काळजी घ्यावी लागेल. कोथिंबीरची मुळे पाण्याने हळूवारपणे धुवा. त्यांना टिश्यूमध्ये गुंडाळा किंवा हवाबंद पिशवीत ठेवा. मुळे ओलावा टिकवून ठेवतात आणि पाने लवकर सुकत नाहीत.
तुम्ही जर कोथिंबीर पॉलीबॅगमध्ये ठेवत असाल तर त्यात लहान छिद्रे करा. यामुळे हवा फिरू शकेल आणि कोथिंबीरमध्ये बुरशी येण्याची शक्यता कमी होईल. तथापि, कोथिंबीर पूर्णपणे धुऊन वाळवल्यानंतरच पॉलिबॅगमध्ये साठवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)