थंडीच्या दिवसांत आजारांपासून राहायचय दूर? रोजच्या आहारात खा हे पदार्थ, मजबूत होईल रोगप्रतिकारशक्ती
हिवाळ्यात थंडी आणि बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. अशा दिवसांत शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते, जाणून घेऊया.

Winter Health Care: हिवाळ्याची चाहूल लागताच वातावरणात गारवा वाढू लागतो. तापमानातील बदल आणि थंड हवेमुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास या समस्या अधिक जाणवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. आयुर्वेदातही या ऋतूत काही पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषक घटक देण्यास मदत करतात. जाणून घेऊया, हिवाळ्यात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
शेंगदाणे आणि गूळ: खाहिवाळ्यात शेंगदाणे आणि गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि अनेक पोषक घटक असतात. हे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. गुळामध्ये लोह आणि खनिजे असल्याने त्याचेही मर्यादित प्रमाणात सेवन करता येते. तुम्ही शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून लाडू बनवू शकता.
च्यवनप्राश खा: च्यवनप्राश अनेक आयुर्वेदिक घटकांपासून तयार केला जातो. त्यामध्ये आवळ्यासह विविध औषधी वनस्पतींचा समावेश असतो. च्यवनप्राशमधील पोषक घटक रोगप्रतिकारक यंत्रणेच्या सामान्य कार्यासाठी मदत करू शकतात. तसेच त्यातील काही घटक पचनासाठीही उपयुक्त ठरतात. मात्र, च्यवनप्राशमध्ये साखरेचे प्रमाण असू शकते, त्यामुळे त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
रोज एक आवळा खा: आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असते. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्मही असतात. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर ठरू शकतो. हिवाळ्यात रोज एक ताजा आवळा खाऊ शकता. आवळ्याचा रस किंवा मुरांब्याचाही आहारात समावेश करता येतो. मात्र, मुरांब्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते.
दुधासोबत अंजीर खा: अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. अंजीर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. हिवाळ्यात एका ग्लास दुधात दोन ते तीन अंजीर घालून उकळून घ्या. त्यानंतर हे दूध कोमट झाल्यावर प्या. दूध आणि अंजीर यांमधून शरीराला विविध पोषक घटक मिळतात.