सोलकढी बनवण्यासाठी नारळ, कोकमासह वापरा हा पदार्थ, एकदम होईल टेस्टी
वाढत्या उन्हाळ्यात शरीराला ताजगी देणारे कोकणी पेय म्हणजे सोलकढी. नारळाच्या दुधापासून बनवलेली ही रेसिपी सोपी आहे. मिरची, लसूण, कोकम आणि कोथिंबिरीचा वापर केला जातो.
solkadhi
Image Credit source: tv9 marathi
सध्या वाढत्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. उन्हामुळे शरीरातील वाढते तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पेय पदार्थांचे सेवन केले जाते. वाढत्या उन्हाळ्यामुळे हैराण झालेले अनेक लोक थंड पेय पितात. यातील एक थंड पेय म्हणजे सोलकढी. हे कोकणातील एक प्रसिद्ध पेय आहे. कोकणातील प्रत्येक घरात जेवणाचा बेत झाल्यानंतर सोलकढी ही केली जाते. नारळाच्या दुधापासून बनवलेली ही पारंपरिक कोकणी रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. आज आपण घरी सोप्या पद्धतीने सोलकढी कशी बनवायची, हे पाहणार आहोत.
साहित्य
- किसलेले खोबरं
- पाणी
- पाच ते सहा कोकम किंवा कोकम आगळ
- मिरची
- लसूण – चार ते पाच पाकळ्या
- कोथिंबीर
- मीठ
कृती
- सर्वप्रथम मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यात किसलेले खोबरे घालून एकदा फिरवून घ्या.
- यानंतर त्या खोबऱ्यामध्ये मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ टाका आणि वाटून घ्या.
- मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रणे एका स्वच्छ रुमाल किंवा पातळ कपड्याने गाळून घ्या. जितके शक्य असेल तितके नारळाचे दूध काढून घ्या.
- यानंतर तुम्ही कोकम एका वाटीत भिजवून थोडावेळ ठेवा. ते हाताने चांगले मॅश करा, जेणेकरुन त्याला रंग येईल आणि हे पाणी सोलकढीत टाका.
- जर तुमच्याकडे कोकमचा आगळ असेल तर तो नारळाच्या दुधात घातला तरी चालेल.
- यानंतर तयार सोलकढी थंड होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ग्लासमध्ये घेऊन त्यावर आठवणीने बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.
सोलकढीचे फायदे
- पचनशक्ती सुधारते – कोकममध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नारळाच्या दुधातील फायबर पचनक्रियेस मदत करतात. जड जेवणानंतर सोलकढी घेतल्याने आराम मिळतो. तसेच जंताची समस्या कमी होते.
- वजन कमी करण्यास मदत – सोलकढीमुळे पोट भरते. भूक नियंत्रणात राहते. पोटाचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
- त्वचेवरील पुरळ कमी होतात – पित्तामुळे येणारे लाल चट्टे कमी करण्यासाठी कोकमचा रस फायदेशीर असतो. सोलकढी प्यायल्याने पित्त कमी होते आणि पुरळ शांत होतात.
- हृदयारोगापासून मुक्ती – नारळाच्या दुधातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. मधुमेह आणि इतर आजारांपासून बचाव होतो.
- शरीराला थंडावा मिळतो – कोकम थंड आहे. त्यामुळे सोलकढी प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो. शरीराची जळजळ कमी होते आणि जखमा लवकर बऱ्या होतात.