प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक

प्रथिने आणि आर्यनने समृद्ध असलेली तूर डाळ शरीरासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहित आहे. पण हीच तूर डाळ काही लोकांसाठी धोकादायक असून विषाप्रमाणे ठरू शकते. जास्त सेवनाने विविध व्याधी निर्माण होऊ शकतात. कोणत्या लोकांनी तूर डाळ खाणे टाळावे हे जाणून घेऊयात.

प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक
Tur dal, which is rich in protein and iron, can be dangerous for these people
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2025 | 7:52 PM

प्रत्येक कडधान्य, डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक घरात डाळ ही बनतच असणार. कारण या डाळी प्रथिनांनी आणि अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. त्यातील एक म्हणजे तूर डाळ. कारण तूर डाळ ही चवीला स्वादिष्ट आणि पोषक घटकांनी समृद्ध असते. त्यामुळे लोक फार चवीने ती खातात. पण हीच तूर डाळ अनेकांसाठी धोकादायक ठरू शकते. कोणत्या लोकांनी ही डाळ खाणे टाळावे हे जाणून घेऊयात.

या लोकांनी तूर डाळ खाणे शक्यतो टाळावे

किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक : किडनीच्या रुग्णांनी तुर डाळीचे सेवन करणे टाळावे. तुरीच्या डाळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे किडनीच्या समस्या वाढू शकतात. या डाळीचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन देखील होऊ शकतात.

जास्त यूरिक अ‍ॅसिड असलेले लोक : शरीरात जास्त यूरिक अ‍ॅसिड असलेले लोक तुरीची डाळ खाणे टाळावे. कारण त्यातील प्युरिनमुळे यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते आणि सांधेदुखी आणि सूज येऊ शकते. म्हणून, युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी तूरीऐवजी कमी प्युरिन असलेल्या मूग किंवा मसूर डाळ यासारख्या डाळींचे सेवन करावे पण तेही अगदी मर्यादित.

पोटाच्या समस्या असलेले लोक : तूर डाळीमुळे काही लोकांमध्ये पचन समस्या उद्भवू शकतात. त्यात असलेले प्रथिने पचनसंस्थेला पचण्यास जास्त वेळ लागतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते. मूळव्याधी असलेल्या लोकांमध्ये, ते बद्धकोष्ठता वाढवू शकते, ज्यामुळे सूज किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे डाळ खायचीच असल्यास हलकी असणारी मूगाची डाळ खावी तेही प्रमाणात.

अ‍ॅलर्जी असलेले लोक : काही लोकांना तुरीच्या डाळीतील प्रथिनांची अ‍ॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, अंगावर पित्त येणे, खाज सुटणे अशी बरीच लक्षणे उद्भवू शकतात. ही एक प्रकारची फूड अ‍ॅलर्जी आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रथिनांना हानिकारक पदार्थ समजते आणि हिस्टामाइन सारखी रसायने सोडते, ज्यामुळे अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया होते.

त्यासाठी अशा लोकांनी शक्यतो तुरीची डाळ खाणे टाळावे. तसेच इतर डाळी जरी खायच्या असतील तरी त्या अगदी मर्यादीत प्रमाणात खाव्यात जेणेकरून त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.