Yoga Tips: डिसेंबरमध्ये लग्न आहे? आजपासूनच करा हे 3 योगासनं, फिटनेससोबत चेहऱ्यावरही येईल ग्लो!

डिसेंबर महिन्यात तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुमचेच लग्न ठरले असेल, तर आतापासूनच फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लग्नात सुंदर आणि फिट दिसण्यासाठी महागड्या जिमची गरज नाही. घरच्या घरी नियमितपणे ही 3 सोपी योगासनं करा.

Yoga Tips: डिसेंबरमध्ये लग्न आहे? आजपासूनच करा हे 3 योगासनं, फिटनेससोबत चेहऱ्यावरही येईल ग्लो!
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 10:15 AM

डिसेंबर महिना जवळ येताच लग्नसराईची लगबग सुरू होते. तुमच्याही घरात लग्नकार्य असेल किंवा तुमचेच लग्न ठरले असेल, तर कपडे, दागिने आणि इतर तयारीसोबत स्वतःच्या फिटनेसकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. लग्नाच्या काळात प्रत्येकाला सुंदर, फ्रेश, फिट दिसावे असे वाटते. मात्र, लग्नाच्या तयारीतील धावपळ, अपुरी झोप आणि कामाचा ताण यामुळे शरीर थकून जाते. अशावेळी फिटनेससाठी रोज जिममध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी काही सोपी योगासने करून तुम्ही शरीर सक्रिय आणि मन प्रसन्न ठेवू शकता. चला तर मग, अशी 3 योगासने जाणून घेऊया, जी तुम्ही डेली रूटीनमध्ये सहज समाविष्ट करू शकता.

ताडासन : हे आसन दिसायला साधे असले तरी शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी आणि शरीराचा तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त आसन आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ ठेवून सरळ उभे राहा. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने न्या आणि हातांची बोटे एकमेकांत गुंफा. आता हळूहळू टाच जमिनीवरून वर उचला आणि शरीराचा भार पायांच्या बोटांवर सांभाळण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत काही सेकंद राहा आणि त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत या. सुरुवातीला २ ते ३ वेळा या आसनाचा सराव करू शकता.

Loading...

भुजंगासन : दिवसभर एकाच जागी बसून काम करणे किंवा सतत धावपळ केल्यामुळे पाठ आणि कंबरेच्या भागात ताण जाणवू शकतो. अशावेळी भुजंगासन केल्याने शरीराच्या पुढील भागाला चांगला स्ट्रेच मिळतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि दोन्ही तळहात खांद्याच्या जवळ जमिनीवर ठेवा. आता श्वास घेत हळूहळू डोके, मान आणि छातीचा भाग वर उचला. यावेळी नाभीपासून खालचा भाग जमिनीवरच ठेवा. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर श्वास सोडत हळूहळू पूर्व स्थितीत या. हे आसन करताना शरीरावर क्षमतेपेक्षा जास्त ताण देऊ नका.

बालासन : लग्नाची तयारी करताना मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. अशावेळी बालासन शरीराला आराम देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यांवर बसून घ्या. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवून शरीराचा पुढील भाग हळूहळू जमिनीच्या दिशेने वाकवा. कपाळ जमिनीला टेकवा आणि दोन्ही हात समोरच्या दिशेने पसरवा. या स्थितीत आरामात श्वास घेत काही वेळ थांबा. त्यानंतर हळूहळू पूर्व स्थितीत या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us