
उन्हाळ्याचे दिवस हे अनेकदा आपल्या केसांसाठी आव्हानात्मक ठरते. कारण या दिवसांत तीव्र सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि प्रदूषण यांचे परिणाम सर्वप्रथम केस आणि स्कॅल्पवर होत असतात. परिणामी केस कोरडे होतात, त्यांची चमक कमी होते. जर तुम्हालाही केस विंचरताना जास्त केस गळत असल्याचे लक्षात येत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या केसांची मुळं मजबुत करण्यासाठी व केस गळती रोखण्यासाठी योग्य हेअर ऑइलचा वापर करणे महत्वाचे आहे. तर आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात केसांच्या वाढीस मदत करणाऱ्या पाच उत्कृष्ट तेलांबद्दल जाणून घेऊया.
1. खोबरेल तेल
खोबरेल तेल हे आपल्या घरांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तेलांपैकी एक आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ केसांवरच राहत नाही, तर केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांचे पोषण करते. नारळाच्या तेलात असलेले फॅटी ॲसिड्स केसांमधील प्रथिनांचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे केस तुटणे कमी होते आणि केसांच्या मुळांना मजबूत करतात.
कसे वापरावे :
उन्हाळ्यात केसांना रात्रभर तेल लावून ठेवण्याऐवजी अंघोळीच्या 30 मिनिटे आधी हलक्या हाताने मालिश करणे उत्तम ठरते. यामुळे स्कॅल्पला आराम मिळतो आणि घामामुळे होणारी खाज कमी होते.
2. बदामाचे तेल
तुम्हाला जर केसांसाठी जड तेल आवडत नसतील तर बदामाचं तेल एक उत्तम पर्याय आहे. हे तेल हलकं असतं आणि स्कॅल्पमध्ये पटकन शोषलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे केसांची मुळं मजबूत करतात आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
एक छोटीशी टीप :
केस धुतल्यानंतर केसांच्या टोकांना बदामाच्या तेलाचे दोन-तीन थेंब लावल्यास केसांचा कुरळेपणा कमी होतो आणि केस मऊ राहतात.
3. एरंडेल तेल
तुमचे केस जर खुप पातळ झाले असतील किंवा हेअरलाइन मागे सरकत असेल, तर एरंडेल तेल खूप उपयुक्त मानले जाते. त्यातील रिसिनोलिक अॅसिड स्कॅल्पमधील रक्तसंचार वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते.
उन्हाळ्यात कसे वापरावे :
एरंडेल तेल बरेच घट्ट असते, त्यामुळे ते थेट लावण्याऐवजी खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात मिक्स करून लावणे उत्तम ठरेल. यामुळे ते लावणे आणि धुवून काढणे सोपे होते.
4. आवळा तेल
आयुर्वेदात आवळा केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात आवळ्याचे तेल लावल्याने स्कॅल्पला थंडावा मिळतो, ज्यामुळे ऊन आणि उष्णतेमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते. तसेच, यामुळे अकाली केस पांढरे होणे कमी होण्यासही मदत होते.
5. भृंगराज तेल
आयुर्वेदात भृंगराजला केसांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. हे तेल केसांची मुळे मजबूत करते, टाळूतील रक्तसंचार वाढवते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
जर तुम्हाला कोंडा, तणाव किंवा हवामानातील बदलांमुळे केस गळतीचा त्रास होत असेल, तर भृंगराज तेल खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच हे तेल लावल्याने स्कॅल्प निरोगी राहण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)