
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाथरूममध्ये गाणं गुणगुणायला आवडतात. काहींना तर गाण्याची खूपच आवड असते, पण ते समोरासमोर गाण्यापेक्षा बाथरूममध्ये गाणं अधिक सोयीचं वाटतं. विशेष म्हणजे, अनेकांना बाथरूममध्ये गाताना स्वतःचा आवाज अधिक सुरेल वाटतो. पण असं का होतं? केवळ मनाचा खेळ आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? चला जाणून घेऊया या मागचं रंजक सत्य.
बाथरूममध्ये आवाज सुरेल का वाटतो ?
बाथरूममध्ये आवाज जास्त सुरेल का वाटतो यामागे मुख्य कारण म्हणजे त्याचं बनावटीचं स्वरूप. बाथरूममध्ये टाईल्स, काच, संगमरवरी फरशा यांसारख्या कडक आणि ध्वनी परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागांचा वापर केला जातो. हे पृष्ठभाग आवाज शोषत नाहीत, उलट त्याला परत फेकतात. त्यामुळे आवाजात गूंज (echo) निर्माण होते.
ही गूंज आपल्या मूळ आवाजात भर घालते आणि त्यामुळे आपला आवाज अधिक भरदार, खोल आणि सुरेल वाटतो. बाथरूममधील लहान जागा आणि बंद रचना यामुळे आवाज एका ठिकाणी थांबतो, टक्कर देतो आणि पुन्हा परावर्तित होतो. हेच कारण आहे की तुम्ही बाथरूममध्ये गाता तेव्हा तुमचा आवाज स्टुडिओ इफेक्टसारखा वाटतो.
आरोग्यासाठी फायदा काय ?
फक्त सुरेल वाटतो म्हणूनच नाही, तर बाथरूममध्ये गाणं गाणं मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. जेव्हा तुम्ही गातात, तेव्हा डोपामाइन आणि एंडोर्फिन नावाचे ‘हॅप्पी हॉर्मोन्स’ मेंदूत निर्माण होतात. हे हॉर्मोन्स तुमचा मूड सुधारतात, तणाव कमी करतात आणि एक प्रकारची मानसिक शांती देतात.
गाणं हे स्वतःला व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्यामुळेच जेव्हा कोणी बाथरूममध्ये एकांतात गातं, तेव्हा त्याचं मन मोकळं होतं आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणून अनेकदा लोक आपल्या सर्वात भावनिक किंवा आनंदी क्षणांत गुणगुणायला सुरुवात करतात.
लोक बाथरूममध्ये गातात यावर अनेकदा विनोद केले जातात. “हा बाथरूम सिंगर आहे!” असं म्हणत हसवलं जातं. पण खरं पाहता, बाथरूम सिंगिंग ही केवळ मजा नसून एक मानसिक आरोग्य सुधारणारी सवय आहे. स्वतःशी संवाद साधण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी हे एक सोपं पण प्रभावी माध्यम ठरू शकतं.