
विमान प्रवास म्हणजे अनेकांसाठी नवनवीन आकर्षण, मात्र, या अनुभवाला काहींसाठी वेदनांची किनारही असते. विशेषतः कानात होणाऱ्या झणझणीत वेदना, आवाजात अडथळा किंवा कान ‘ब्लॉक’ झाल्यासारखं वाटणं. हे सर्व लक्षणं ‘एअर प्रेशर’मध्ये झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे होतात, जे विमान टेकऑफ किंवा लँडिंग दरम्यान अधिक तीव्रतेने जाणवतात.
हवेच्या दाबामागचं विज्ञान काय सांगतं?
आपल्या कानामध्ये यूस्टेशियन ट्यूब नावाची एक नळी असते, जी कान आणि घसा यांना जोडते. तिचं मुख्य काम म्हणजे कानामधील आणि बाहेरील हवेचा दाब संतुलित ठेवणं. मात्र, विमान उडताना किंवा उतरताना हवेचा दाब अतिशय जलद बदलतो, आणि ती ट्यूब लगेच समायोजन करू शकत नाही. परिणामी कानात दाब तयार होतो आणि वेदना सुरू होतात.
सर्दी, अॅलर्जी झाल्यास त्रास वाढतो
जर प्रवासादरम्यान सर्दी, खोकला, सायनस किंवा अॅलर्जीचा त्रास असेल, तर ही यूस्टेशियन ट्यूब सुजते आणि पूर्णपणे बंद होऊ शकते. त्यामुळे दाब अधिक तीव्रतेने वाढतो आणि कानदुखी अधिक असह्य होते. विशेषतः लहान मुलांमध्ये ही ट्यूब लहान असल्यामुळे त्यांना हा त्रास जास्त होतो.
वेदना कमी करण्यायाठी काय उपाय कराल ?
1. वेदना कमी करण्याचा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे वारंवार थुकी गिळणं किंवा जांभई देणं. यामुळे यूस्टेशियन ट्यूब उघडते आणि कानात तयार झालेला दाब कमी होतो. टेकऑफ किंवा लँडिंगच्या क्षणी ही कृती नियमित केल्यास त्रास टाळता येतो.
2. च्युइंगम चघळल्याने लाळ वाढते आणि गिळण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. लहान मुलांना च्युइंगम न देता दूध पाजणं किंवा पॅसिफायर देणं हा एक प्रभावी पर्याय ठरतो. यामुळे त्यांचाही कानाचा दाब नियंत्रित राहतो.
3. नाक बंद करून, तोंड बंद ठेवून नाकातून सौम्यपणे हवा सोडण्याचा प्रयत्न करा. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी कानातील आणि बाहेरील दाब समसमान ठेवते. सर्दी असल्यास प्रवासापूर्वी वाफ घेणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने डिकॉन्जेस्टंट घेणं उपयुक्त ठरतं.
4. प्रेशर इयरप्लग्स हे खास विमान प्रवासासाठी डिझाइन केलेले असतात. हे कानातील हवेचा दाब हळूहळू समायोजित करतात. अशा इयरप्लग्सचा वापर, विशेषतः सर्दी किंवा अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी करणे फायदेशीर ठरते.
विमान प्रवासाचा आनंद खऱ्या अर्थाने घेण्यासाठी ‘कानाचं आरोग्य’ दुर्लक्षित करू नका. यूस्टेशियन ट्यूबची काळजी, योग्य उपाययोजना आणि थोडी पूर्वतयारी केल्यास तुम्ही कोणतीही वेदना न होता तुमचं आकाशवाटेचं सफर शांत, सुखद आणि संस्मरणीय करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)